पदभार घेताच ज्योतिरादित्य शिंदेंना उच्च न्यायालयानं दिलं पहिलं काम...

नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने हा आदेश देण्यात आला आहे.
Formulate a new policy for naming of airports says Bombay High court
Formulate a new policy for naming of airports says Bombay High court

नवी दिल्ली : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला. त्यानंतर पहिल्याच दिवशी मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना पहिलं काम दिलं आहे. विमानतळांच्या नामकरणाचे देशपातळीवरील धोरण तातडीने तयार करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. नवी मुंबईतील विमानतळाच्या नामकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने हा आदेश देण्यात आला आहे. (Formulate a new policy for naming of airports says Bombay High court)

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जी. एस. कुलकर्णी यांनी हे आदेश दिले आहेत. वकील फिलजी फ्रेड्रीक यांनी केलेल्या जनहित याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यावर आता 16 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून 24 जून रोजी स्थानिकांनी मोठं आंदोलन केलं होतं. यावेळी सुमारे 25 हजारांहून अधिक लोकं जमा झाले होते. कोरोना काळामध्ये एवढी गर्दी झाल्याने त्यावर न्यायालयाने नाराजीही व्यक्त केली.

विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नावे देण्याचे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. तर स्थानिकांनी दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालय अतिरिक्त सॅालिसिटर जनरल अनिल सिंग यांना म्हणाले, 'नामकरणाबाबतचे नवीन धोरण अजूनही आराखड्याच्या पातळीवर असेल तर ते लगेच पूर्ण करा. तुमच्याकडे आता नवीन मंत्री आहेत. नवीन उड्डाण मंत्र्यांना हे काम करू द्या. त्यांच्यासाठी हे पहिलं काम असेल.'

'धोरणाची सध्याची स्थिती काय आहे, याची माहिती द्यावी. मागील महिन्यात कोरोना नियमांचा भंग करत सुमारे 25 हजार लोक एकत्र आले होते. आपण याला मान्यता कशी देतो?. 2016 मध्ये तयार करण्यात आलेल्या आराखड्यामध्ये विमानतळांना व्यक्तींच्या नावांऐवजी शहरांच नावं देण्याचे सुत्र ठरले होते. आता त्या धोरणाची स्थिती माहिती नाही,' असंही न्यायालय म्हणाले. 

दरम्यान, नवी मुंबईतील विमानतळावरून स्थानिकांनी दि. बा. पाटील यांच्या नावासाठी जोरदार आग्रह धरला आहे. स्थानिक माघार घेण्यास तयार नसल्याने हा वाद चिघळला आहे. तसेच शिवसेनाही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर ठाम आहे. तर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांचे नाव पुढे करत या वादात उडी घेतली आहे. केंद्र सरकारकडून विमानतळांच्या नावांबाबत धोरण निश्चित केले नसल्याने वाद निर्माण होत आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in