हरी नरकेंचे 9 मुद्यांवर फडणवीसांना ओपन चॅलेंज - Hari Narke gives open challenge to Devendra Fadnavis on OBC Reservation | Politics Marathi News - Sarkarnama

हरी नरकेंचे 9 मुद्यांवर फडणवीसांना ओपन चॅलेंज

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 9 जुलै 2021

ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून आता ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांना चर्चेचं खुलं आव्हान दिलं आहे. फडणवीस प्रश्नांपासून पळ काढू नका, हे पाप तुमचेच आहे. बहुजनांचा बुद्धीभेद नी शब्दच्छल करण्याचा पिढीजात उद्योग का करताय? करता का आमने सामने चर्चा? ओपन चॅलेंज करतो, आहे हिम्मत?, असं खुलं आव्हान प्रा. नरके यांनी दिलं आहे. (Hari Narke gives open challenge to Devendra Fadnavis on OBC Reservation)

प्रा. नरके यांच्याकडून सातत्याने फडणवीस यांना लक्ष्य केलं जात आहे. ओबीसी समाजाच्या डेटावरून फडणवीस यांच्याकडून तत्कालीन काँग्रेस सरकारसह महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धऱले जात आहे. काँग्रेसच्या काळात केंद्राला दिलेल्या माहितीमध्ये सुमारे सात लाख चुका असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यावरून प्रा. नरके यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याबाबत फेसबुक पोस्टमध्ये नऊ मुद्दे उपस्थित करून फडणवीसांना चर्चेचं आव्हान दिलं आहे. 

हेही वाचा : भाजपसमोर तिढा; शपथविधी झाला व खातेवाटपावरून वाद वाढला

फडणवीस प्रश्नांपासून पळ काढू नका, असं म्हणत प्रा. नरके यांनी हे मुद्दे मांडले आहेत. 

१) केंद्राचा डेटा मागू नका म्हणता तर तुम्ही स्वतः १/८/२०१९ ला केंद्राकडे का मागितला होता?

२) तुमच्या ग्रामविकास मंत्र्यांनी ८ आठवड्यात आम्हाला सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यायचीय, तरी त्वरा करा असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना का लिहिले होते? तुम्ही आठ आठवड्यात ही माहिती न्यायालयाला दिली नाही म्हणून आरक्षण गेले. हे पाप तुमचे. 

३) जी माहिती २०१६ मध्ये मोदी सरकारने बॅन केली तिची पावती तुम्ही काँग्रेस सरकारवर का फाडता? 

४) त्या माहितीत ८ कोटी चुका असल्याचा जावईशोध तुम्ही कसा लावला? केंद्र सरकारने तुम्हाला डझनावारी पत्रे लिहिली त्यात तर एकाही चुकीचा उल्लेख नाही, मग हा डेटा न बघताच तुम्हाला ८ कोटी चुका असल्याचा भास झाला का? 

५) तुमच्या मातृसंस्थेने जातगणनेला लेखी विरोध केला होता (२४/५/२०१०) म्हणून तीत चुका असल्याचा डंका तुम्ही पिटताय. कोल्ह्याला द्राक्षे आंबट. 

६) ३ महिन्यात डेटा जमवता येतो तर ६० महिने काय केले? 

७) डेटात चुका होत्या तर मोदी सरकारने नवा, बिनचूक obc डेटा गेल्या ७ वर्षात का जमवला नाही? 

८) न्या. रोहिणी आयोगाला डेटा दिला नाही म्हणता, मग ज्यांच्या ताब्यात तो आहे त्या RGI ना या आयोगात सदस्य कशासाठी नेमलंय? 

९)केंद्र सरकार एकही चूक असल्याचे सांगत नसताना तुम्हाला ८ कोटी चुका कशा कळल्या? 

हेही वाचा : आयपीएस अधिकाऱ्याचे आधी निलंबन अन् आता देशद्रोहाचा गुन्हा

फडणवीसपंत, प्रश्न मी जाहीरपणे समाज माध्यमे व वाहिन्यांवरून तुम्हालाच विचारलेत,जाहीर उत्तरे द्या, पळ काढू नका."आरक्षण मुक्त भारताचे तुम्ही पाईक असताना " बहुजनांचा बुद्धीभेद नी शब्दच्छल करण्याचा पिढीजात उद्योग का करताय? करता का आमने सामने चर्चा? ओपन चॅलेंज करतो, आहे हिम्मत?, असे प्रा. नरके यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख