तुरूंगातून बारावीची परीक्षा दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा निकाल रोखला

शिक्षक भरती घोटाळ्यात दहा वर्षांची शिक्षा झाली होती.
Ex CM Omprakash Chautals 12th result on hold
Ex CM Omprakash Chautals 12th result on hold

चंदीगड : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांनी तुरूंगात राहून इयत्ता दहावीची परीक्षा दिली. या परीक्षेत ते उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीच्या परीक्षेचीही त्यांनी तयारी केली. या परीक्षेतही त्यांना उत्तीर्ण होण्याची अपेक्षा होती. गुरूवारी निकाल जाहीर होणार असल्यानं ते निकालाची वाट पाहत बसले होते. पण मंडळाने त्यांचा निकालच राखून ठेवल्याने त्यांची निराशा झाली आहे. (Ex CM Omprakash Chautals 12th result on hold)

चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात दहा वर्षांची शिक्षा झाली होती. काही दिवसांपूर्वीच ते शिक्षा पूर्ण करून घरी परतले आहेत. त्यांना तिहार तुरूंगात शिक्षा भोगली आहे. शिक्षा भोगत असताना त्यांनी हरयाणा ओपन बोर्ड ऑफ स्कूल एज्यूकेशन या मंडळामार्फत 2017 मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा दिली. तुरूंगातच परीक्षा केंद्राचे नियोजन करण्यात आलं होतं. दहावीला त्यांना 53.40 टक्के गुण मिळाले. 

ही परीक्षा ते उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी याच हरियाणा मंडळामार्फत बारावीचीही परीक्षा दिली होती. 86 वर्षांचे चौटाला तुरूंगातून घरी परतल्यानंतर गुरूवारी निकालाची वाट पाहत होते. पण मंडळाने तांत्रिक मुद्दा उपस्थित करून त्यांचा निकाल राखून ठेवला आहे. दहावीमध्ये इंग्रजी किंवा हिंदी हा विषय नसल्याने मंडळाने त्यांचा निकाल लावण्यास नकार दिला आहे. मंडळाचा तसा नियमच आहे. चौटाला यांचा दहावीमध्ये उर्दू हा विषय होता.

हरियाणा मंडळाच्या नियमानुसार इंग्रजी किंवा हिंदी विषय घेऊन उत्तीर्ण असल्याशिवाय विद्यार्थ्याला उत्तीर्ण मानले जात नाही. चौटाला यांचा दहावीमध्ये दोन्हीपैकी एकही विषय नव्हता. त्यामुळं त्यांचा बारावीचा निकाल जाहीर केला जाणार नाही. त्यासाठी त्यांना आता दहावीची इंग्रजी किंवा हिंदी विषयाची परीक्षा देऊन ती उत्तीर्ण व्हावी लागेल. ही पुढील काही दिवसांतच होणार आहे. अन्यथा त्यांना राष्ट्रीय मुक्त मंडळाची बारावीची परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेसाठी त्यांना वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. 

मंडळाचे अध्यक्ष डॉ. जगबीर मलिक म्हणाले, तांत्रिक अडचणीमुळे माजी मुख्यमंत्र्यांसह सहा विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. चौटाला यांनी दहावीची परीक्षा इंग्रजी किंवा हिंदी विषयासह उत्तीर्ण केलेली नाही. मुक्त मंडळामध्ये हिंदी किंवा इंग्रजी विषयाचे बंधन नाही. हरियाणा मंडळामध्ये मात्र दहावी उत्तीर्ण होण्यासाठी इंग्रजी किंवा हिंदी विषय असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com