जामिनानंतरही दिशाला कोठडीत ठेवण्याचा पोलिसांच्या डावावर पाणी!

पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिच्या अटकेवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. अखेर तिला न्यायालयाने दिलासा दिला आहे.
isha ravi police custody demand by delhi police rejected by court
isha ravi police custody demand by delhi police rejected by court

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट'मुळे चर्चेत आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. दिशाला जामीन मिळाल्यानंतर तिची पुन्हा पोलीस कोठडी मिळवण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी तत्काळ दुसऱ्या न्यायालयात केला. परंतु, पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळून लावल्याने हा प्रयत्न अखेर फसला. 

दिशा या 22 वर्षीय तरुणीला 13 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. तिला बंगळूरमधील निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. शेतकरी आंदोलनाशी निगडित 'टूलकिट' प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. दिशाने सहा दिवस पोलीस कोठडीत काढले आहेत. तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दिशाला एक लाख रुपयांच्या प्रत्येकी दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. 

दिशाला जामीन मिळाल्यानंतर तिची सुटका होऊ नये, असा नियोजन पोलिसांनी केले होते. त्यामुळे तिची पुन्हा पोलीस कोठडी मिळावी, यासाठी दिल्ली पोलिसांनी मुख्य महानगर न्यायंदंडाधिकाऱ्यांसमोर धाव घेतली. मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी पंकज मिश्रा यांनी पोलिसांची ही मागणी फेटाळून लावत दिशाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यास नकार दिला. दिशाला आणखी चार दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. 

दरम्यान, याआधी झालेल्या सुनावणीवेळी दिशाच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले होते की, शेतकऱ्यांशी संबंधित 'टूलकिट'मुळे प्रजासत्ताक दिनी हिंसाचार झाला, हे दर्शविणारे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. दिल्लीत हिंसाचार झाला त्यावेळी आंदोलक 'टूलकिट'ची कॉपी खिशात ठेवून आले होते का? हिंसाचारासाठी 'टूलकिट' जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनास आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करणे हा देशद्रोह असेल तर मी तुरुंगामध्येच चांगली आहे, असेही दिशाने सुनावणीदरम्यान सांगितले. मागील सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पोलिसांना धारेवर धरत काही प्रश्न विचारले होते. ते म्हणाले होते की, मी मंदिरासाठी दरोडेखोराकडे देणगी मागितली तर माझाही दरोड्यात सहभाग मानला जाईल का? 'टूलकिट' म्हणजे नेमकं आहे तरी काय? त्यामुळेच 26 जानेवारीला हिंसाचार झाला याचे पुरावे तुमच्याकडे आहेत का? समजा मी एका आंदोलनाशी जोडला गेलो आहे आणि याच उद्देशाने इतरांना भेटत असेल तर मलाही तुम्ही त्यांच्यातील समजाल काय? 

दिल्ली पोलिसांनी सुनावणीदरम्यान दिशाच्या जामीन याचिकेला विरोध केला. खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींसोबत मिळून दिशाने 'टूलकिट' तयार केले. भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या कारस्थानाचाच तो एक मोठा भाग आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com