पोलिसांच्या संशयास्पद तपासावर ताशेरे ओढत न्यायालयाचा अखेर दिशाला मोठा दिलासा

पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिच्या अटकेवरुन मोठा गदारोळ सुरू आहे. अखेर तिला न्यायालयाने दिलासा दिला आहे.
activist disha ravi granted bail by delhi court in toolkit case
activist disha ravi granted bail by delhi court in toolkit case

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट'मुळे चर्चेत आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला दिल्ली सत्र न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला. या वेळी न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढत दिशाला जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण दिसत नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे दिशाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

दिशा या 22 वर्षीय तरुणीला 13 फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. तिला बंगळूरमधील निवासस्थानातून अटक करण्यात आली होती. शेतकरी आंदोलनाशी निगडित 'टूलकिट' प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. दिशाने सहा दिवस पोलीस कोठडीत काढले आहेत. तिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दिशाला एक लाख रुपयांच्या प्रत्येकी दोन जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. 

या वेळी न्यायाधीश राणा यांनी पोलिसांच्या तपासावरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणात अपुरे आणि संशयास्पद पुरावे सादर केले आहेत. यातून 22 वर्षीय दिशाला जामीन नाकारण्याचे कोणतेही कारण समोर येत नाही. याआधी तिची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे तिला जामीन मंजूर करण्यात येत आहे. 

दरम्यान, याआधी झालेल्या सुनावणीवेळी दिशाच्या वकिलांनी न्यायालयात म्हटले होते की, शेतकऱ्यांशी संबंधित 'टूलकिट'मुळे प्रजासत्ताक दिनी हिंसाचार झाला, हे दर्शविणारे कोणतेही पुरावे समोर आले नाहीत. दिल्लीत हिंसाचार झाला त्यावेळी आंदोलक 'टूलकिट'ची कॉपी खिशात ठेवून आले होते का? हिंसाचारासाठी 'टूलकिट' जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. 

शेतकऱ्यांच्या आंदोलनास आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करणे हा देशद्रोह असेल तर मी तुरुंगामध्येच चांगली आहे, असेही दिशाने सुनावणीदरम्यान सांगितले. मागील सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पोलिसांना धारेवर धरत काही प्रश्न विचारले होते. ते म्हणाले होते की, मी मंदिरासाठी दरोडेखोराकडे देणगी मागितली तर माझाही दरोड्यात सहभाग मानला जाईल का? 'टूलकिट' म्हणजे नेमकं आहे तरी काय? त्यामुळेच 26 जानेवारीला हिंसाचार झाला याचे पुरावे तुमच्याकडे आहेत का? समजा मी एका आंदोलनाशी जोडला गेलो आहे आणि याच उद्देशाने इतरांना भेटत असेल तर मलाही तुम्ही त्यांच्यातील समजाल काय? 

दिल्ली पोलिसांनी सुनावणीदरम्यान दिशाच्या जामीन याचिकेला विरोध केला. खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींसोबत मिळून दिशाने 'टूलकिट' तयार केले. भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या कारस्थानाचाच तो एक मोठा भाग आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com