धक्कादायक : कोरोना लस देण्याच्या बहाण्याने अविवाहित मूकबधिर तरुणाची नसबंदी

सरकारने कोरोना लसीकरणावरील भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत.
deaf and mute man sterilised on pretext of giving covid vaccine
deaf and mute man sterilised on pretext of giving covid vaccine

नवी दिल्ली : सरकारने कोरोना लसीकरणावरील (Covid Vaccination) भर वाढवला आहे. असे असले तरी लसीकरणातील गोंधळाचे रोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. उत्तर प्रदेशात लसीकरणाच्या नावाखाली एका अविवाहित मूकबधिर तरुणाची नसबंदी (Sterilization) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या तरुणाचे नाव ध्रवकुमार असे आहे. त्याला आशा सेविका कोरोना लस देण्यासाठी रुग्णालयात घेऊन गेली होती. तिथे त्याची नसबंदी शस्रक्रिया करण्यात आली. सकाळी त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. शस्त्रक्रिया केल्यानंतर सायंकाळी त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. हा तरुण घरी पोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. आशा सेविकेने लस घेतल्यास पैसे मिळतील, असे सांगून त्याला रुग्णालयात नेले होते, असा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. आशा सेविकेला तो तरुण अविवाहित असल्याचे माहिती असूनही तिने त्याला शस्त्रक्रियेसाठी कसे नेले, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. 

या प्रकरणी मोठा गदारोळ झाल्यानंतर पोलिसांनी आरोग्य विभागाकडे चौकशी अहवाल मागितला आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी तातडीने त्या तरुणाच्या गावी पोचले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाने नसबंदी शस्त्रक्रियेच्या अर्जावर सही केली होती. त्याला विचारल्यानंतर त्याने इशाऱ्याने तीन मुले असल्याचे सांगितले होते. याचवेळी शस्त्रक्रिया करताना त्या तरुणाने कोणताही विरोध केला नाही. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

सध्या देशात कोरोना लसीकरणाचा चौथा टप्पा सुरू आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जात आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात 1एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना ही लस दिली जात आहे. जगातील सर्वात मोठ्या कोरोना लसीकरणास भारतात 16 जानेवारीला सुरवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सरकारने लस देण्याचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. यातील पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, कोरोनाच्या आघाडीवर लढणारे पोलीस, नागरी सुरक्षा कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचारी यांचा समावेश होता. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ही लस 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आली. तसेच, मधुमेह आणि उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्या 45 वर्षांवरील व्यक्तींनाही लस दिली गेली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com