गुड न्यूज : कोर्बेव्हॅक्स ठरणार देशातील सर्वांत स्वस्त कोरोना लस

बायोलॉजिकल-ई कंपनी सरकारला कोर्बेव्हॅक्स या लशीचे 30 कोटी डोस देणार आहे. ही लस देशातील सर्वांत स्वस्त लस ठरणार आहे.
corbevax may be cheapest vaccine available in india
corbevax may be cheapest vaccine available in india

नवी दिल्ली : कोरोना (Covid-19) लशीच्या टंचाईमुळे देशातील लसीकरण मोहिमेला (Covid Vaccination) खीळ बसला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारने आता हैदराबादमधील बायोलॉजिकल-ई (Biological-E) या कंपनीशी करार केला आहे. सरकारने या कंपनीला 1 हजार 500 कोटी रुपयांचा आगाऊ निधी दिला असून, कंपनी कोर्बेव्हॅक्स (Corbevax) या लशीचे 30 कोटी डोस देणार आहे. ही लस देशातील सर्वांत स्वस्त लस ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

कोर्बेव्हॅक्स ही आणखी एक मेड इन इंडिया लस भारताला मिळाली आहे. या आधी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही मेड इन इंडिया लस उपलब्ध होती. आता या जोडीला बायोलॉजिकल-ई या कंपनीची कोर्बेव्हॅक्स लस पुढील काही महिन्यांत उपलब्ध होणार आहे. या कंपनीने लशीचे उत्पादन करुन साठा करुन ठेवल्याने ही लस लवकर मिळणार आहे. सध्या या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ही लस परिणामकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोर्बेव्हॅक्स ही लस देशातील सर्वांत स्वस्त लस ठरण्याची शक्यता आहे. या लशीची किंमत 500 रुपये असणार आहे. परंतु, किंमत एका नव्हे तर दोन डोससाठी असणार आहे. दोन डोससाठीची ही किंमत 400 रुपयांपर्यंतही खाली येऊ शकते. म्हणजेच एका डोससाठी केवळ 200 ते 250 रुरये मोजावे लागलीत. याबाबत कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालिका महिमा डाटला यांनीही संकेत दिले आहेत. अद्याप लशीची अंतिम किंमत निश्चित झालेली नाही. 

सिरमच्या कोव्हिशिल्ड लशीचा एक डोस राज्य सरकारांना 300 रुपये तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना मिळत आहे. याचवेळी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनचा एक डोस राज्य सरकारांना 400 रुपये तर खासगी रुग्णालयांना 1 हजार 200 रुपयांना मिळत आहे. रशियाची स्पुटनिक व्ही लशीच्या एका डोससाठी डॉ.रेड्डीज लॅबकडून 995 रुपये आकारले जात आहेत. ही लस केवळ राज्ये आणि खासगी रुग्णालयांसाठी उपलब्ध आहेत. या किमती पाहता कोर्बेव्हॅक्स ही देशातील सर्वांत स्वस्त लस ठरेल, अशी शक्यता आहे.  

केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने बायोलॉजिकल-ई कंपनीला सुरवातीला 100 कोटी रुपयांचे अर्थ साह्य केले होते. याचबरोबर या विभागाने अनेक संशोधनात कंपनीसोबत भागीदारी केली आहे. देशातील लस उत्पादक कंपन्यांना पाठबळ देण्यासोबत प्रोत्साहन देण्याचे सरकारचे धोरण आहे. याचबरोबर सरकारी आणखी पाच ते सहा लस उत्पादक कंपन्यांना पाठबळ देत आहे. 

देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लशींचा वापर लसीकरणासाठी होत आहे.  केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक व्ही या लशीच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. स्पुटनिकचे उत्पादन डॉ.रेड्डीज ही कंपनी करीत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे. 

आता स्पुटनिक व्ही भारतात दाखल झाली असून, बायोलॉजिकल-ईची लसही उपलब्ध होणार आहे. याचबरोबर सरकार फायजर आणि मॉडर्ना या परदेशी लस उत्पादक कंपन्यांशीही चर्चा करीत आहे. केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. लस टंचाईमुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला आहे. यामुळे सरकारने लस खरेदीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com