पेट्रोल तर आता शुद्ध तुपापेक्षा जास्त महाग झालंय!

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
congress leader sachin pilot slams bjp government over fuel prices
congress leader sachin pilot slams bjp government over fuel prices

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजही पेट्रोल दरात वाढ करण्यात आली आहे. यावरुन काँग्रेस (Congress) नेते सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी मोदी सरकावर (BJP Government) हल्लाबोल केला आहे. पेट्रोल तर शुद्ध तुपापेक्षा महागले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. 

या महिन्यात 17 दिवसांत 10 वेळा पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात  आली आहे. देशभरात आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 29 पैसे वाढ करण्यात आली.  डिझेलचे दरात आज कोणतेही बदल करण्या आलेले नाहीत. सध्या देशात इंधनाचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचले आहेत. अर्ध्या देशात पेट्रोलचा दर 100 रुपयांवर पोचला आहे.

दिल्लीत आज पेट्रोलचा दर 101.54 रुपये तर मुंबई 107.54 रुपयांवर गेला आहे. डिझेलचा दर दिल्लीत 89.87 रुपये आहे. देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ करण्यात येत आहे. 

इंधन दरवाढीवरुन पायलट यांनी भाजप सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, देशात 2014 मध्ये भाजपची सत्ता आल्यापासून जनता वेगवेगळ्या समस्यांनी त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. राजस्थानमध्ये एक वृद्ध व्यक्ती याबद्दल माझ्याशी बोलत होता. इंधनाचे दर आता शुद्ध तुपापेक्षा अधिक आहेत, अशी तक्रार त्याने केली.   

देशातील 250 शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्यावर गेले आहेत. हे कल्पनेपलिकडचे वास्तव आहे. चालू वर्षात सरकारने पेट्रोलच्या दरात 66 वेळा वाढ केली आहे. सरकारनेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील सात वर्षांत पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 250 टक्क्यांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 800 टक्क्यांनी वाढले आहे. याच काळात सरकारने यातून 25 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे. ही सरळसरळ सामान्य माणसाच्या खिशातून होणारी चोरी आहे, असे पायलट म्हणाले. 

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे.यातच आता एलपीजी सिलिंडर दरवाढीची भर पडली आहे. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यांत एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 140 रुपयांची वाढ झाली आहे. याचबरोबर विमान इंधनाच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com