पक्षीय चौकट ओलांडून प्रियांका गांधींनी दाखवलं मोठं मन! - congress leader priyanka gandhi meets samajwadi party woman worker | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

पक्षीय चौकट ओलांडून प्रियांका गांधींनी दाखवलं मोठं मन!

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जुलै 2021

उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवाराची साडी भाजप कार्यकर्त्यांनी ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. 

लखनौ : उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पंचायत समिती (ब्लॅाक प्रमुख) सभापतीसाठीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) महिला उमेदवाराची साडी भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी ओढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. काँग्रेस (Congress) नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आज पक्षीय चौकट ओलांडून या महिलेची भेट घेतली आणि तिला न्याय मिळवून देण्याचा निर्धार केला.  

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या महिला उमेदवाराशी भाजप कार्यकर्त्यांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लखीमपुर खीरी जिल्ह्यातील पसगवां ब्लॅाकमध्ये समाजवादी पक्षाकडून त्या उमेदवारी अर्ज भरण्यास जात होत्या. पण कार्यालयात जाण्यापासून भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची अडवणूक केली होती. हे कार्यकर्ते त्यांची साडी ओढत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. अखेर या महिलेला अर्ज भरताच आला नव्हता.

उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असलेल्या प्रियांका गांधींनी आज समाजवादी पक्षाच्या या महिला कार्यकर्तीची आवर्जून भेट घेतली. उत्तर प्रदेशातील या घटनेने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली होती. प्रियांका गांधींनी पक्षीय चौकट ओलांडून संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी उभ्या राहिल्या आहेत. लखीमपूर खेरीत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी त्यांनी केली. देशातील सर्व महिला तिच्यासोबत उभ्या आहेत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. 

या वेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, निवडणूक लढणे हा त्या महिलेचा घटनात्मक हक्क होता. तो तिच्यापासून हिरावून घेण्यात आला. त्या अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांची साडी ओढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हल्लेखोरांनी थांबवण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही. हल्लेखोरांना अडवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर उलट निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी प्रशासन मूग गिळून गप्प आहे. 

हेही वाचा : पवार-मोदी भेटीमागील कारण नवाब मलिकांनी केलं उघड 

उत्तर प्रदेशात हिंसाचार सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक करण्यात गुंग आहेत. अशा प्रकारे हिंसाचार झाल्यानंतर सर्वसामान्यपणे निवडणूक रद्द केली जाते. तरीही येथे निवडणुका झाल्या. निवडणूक लढण्याचा त्या महिलेला हक्क नाही का? कुणीही 10 गुंड घेऊन येऊन हिंसाचार करीत आहे. ही लोकशाही आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

समाजवादी पक्षाच्या महिला कार्यकर्तीशी गैरवर्तन करणारे भाजपचे समर्थक हे पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा व खासदार रेखा वर्मा यांचे नातेवाईक असल्याची चर्चा आहे. ही घटना समोर आल्यानंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर जोरदार टीका केली होती. यादव यांनी हा व्हिडीओही ट्विट करत निवडणूक जिंकण्यासाठी महिलेचा अपमान केल्याचे म्हटले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख