प्रियांका गांधींनी मनधरणी केल्यानंतर अखेर राहुल गांधींनी कळवला होकार! - congress leader priyanka gandhi convinced rahul gandhi to meet sidhu | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

प्रियांका गांधींनी मनधरणी केल्यानंतर अखेर राहुल गांधींनी कळवला होकार!

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जुलै 2021

काँग्रेसमधील अंतर्गत वाद दिवसेंदिवस समोर येत असून, यात प्रियांका गांधींनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 

नवी दिल्ली : पंजाब (Punjab)  काँगेसमधील  (Congress) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग (Amarinder Singh) यांच्याविरोधात काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू (Navjyot Singh  Sidhu) यांनी आघाडी उघडली आहे. अमरिंदरसिंग यांना डावलून काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) सिद्धू यांना भेट दिल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या भेटीमागील खऱ्या सूत्रधार प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या असल्याचे समोर येत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल आणि सिद्धू यांची कालची (30 जून) भेट पूर्वनियोजित नव्हती. प्रियांका यांनीच राहुल यांची मनधरणी केल्यानंतर ते सिद्धू यांना भेटण्यास तयार झाले. ही भेट सुमारे 45 मिनिटे चालली आहे. पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. सिद्धू हे दिल्लीत दाखल झाले होते आणि त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मागील अनेक दिवसांपासून सिद्धू हे पक्षनेतृत्वाला भेटण्याचा प्रयत्न करीत होते. याचवेळी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनाही पक्ष नेतृत्वाने भेट दिलेली नाही. 

सिद्धू हे काल प्रियांका यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यानंतर त्या पहिल्यांदा राहुल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना भेटल्या. नंतर त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी गेल्या. या सर्व घडामोडी सुरू होत्या त्यावेळी सिद्धू हे प्रियांका यांच्याच निवासस्थानी होते. सिद्धू यांना भेट न दिल्यास अंतर्गत कलह आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रियांका यांनी या प्रकरणी पुढाकार घेतला होता. यानंतर राहुल आणि सिद्धू यांची भेट झाली, असे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा : पडळकर मनोरुग्ण असून, ही पीडा भाजपला मातीत घालणार 

अमरिंदरसिंग यांना भेट नाकारणाऱ्या नेतृत्वाने सिद्धू यांना भेट दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. सिद्धू यांचे पारडे आता जड झाल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी राज्यात काँग्रेसचे नेतृत्व अमरिंदर करतील हे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. पंजाबमध्ये काँग्रेसमधील संघर्ष वाढू लागल्याने दिवसेंदिवस नेतृत्वाची डोकेदुखी वाढू लागली आहे. 

पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. पण त्याआधीच काँग्रेसमधील अनेकांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सातत्याने जोरदार खडाजंगी होत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने काँग्रेसमध्ये उघडपणे दोन गट पडल्याचे दिसते. सिद्धू यांची लोकप्रियता जास्त असल्याने पक्ष नेतृत्वालाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अवघड बनले आहे. 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख