कोरोना लशीमुळे देशात आतापर्यंत एकाचा मृत्यू; केंद्र सरकारची कबुली - central government says only one death due to covid vaccine | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

कोरोना लशीमुळे देशात आतापर्यंत एकाचा मृत्यू; केंद्र सरकारची कबुली

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

देशभरात कोरोना लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूंची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची समिती नेमली होती. 

नवी दिल्ली : कोरोना लस (Covid Vaccine) घेतल्यामुळे होत असलेल्या मृत्यूंची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Government) तज्ञांची समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानुसार देशात कोरोना लशीमुळे केवळ एकच मृत्यू (Death) झाला आहे. लस घेतल्यानंतर 31 जणांना गंभीर दुष्परिणाम जाणवले होते, अशी कबुलीही सरकारने दिली आहे. 

देशात कोरोना लसीकरणास 16 जानेवारीला सुरवात झाली. सध्या देशात तीन कोरोना लशींचा वापर होत आहे. सिरम इन्स्टिट्यूट ही कोव्हिशिल्ड या कोरोना लशीचे उत्पादन करीत आहे. ही लस ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्राझेन्का यांनी विकसित केली आहे. दुसरी लस ही भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही आहे.  याचबरोबर रशियाची स्पुटनिक व्ही लसही देशात उपलब्ध आहे. आता 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जात आहे. 

देशभरात कोरोना लस घेतल्यानंतर झालेल्या मृत्यूंची तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे. एका व्यक्तीचा कोरोना लस घेतल्यामुळे 31 मार्चला मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले आहे, असे अहवालात म्हटले आहे. या व्यक्तीचे वय 68 होते आणि त्याने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतलेले होते. याचबरोबर कोरोना लशीमुळे गंभीर दुष्परिणाम झालेली 31 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. यातील 28 जणांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा : सिरमची आणखी एक लस लवकरच मिळणार  

या विषयी बोलताना केंद्र सरकारच्या लसीकरण समितीचे सल्लागार डॉ.एन.के.अरोरा म्हणाले की, कोरोना लशीमुळे मृत्यू झाल्याचा एकच प्रकार आतापर्यंत समोर आला आहे. एकंदरीत पाहता लशीचे गंभीर दुष्परिणाम होणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे. समितीने अशी 31 प्रकरणे तपासली आणि त्यातील एका प्रकरणात लशीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. यातील तीन प्रकरणांमध्ये लस घेतल्यानंतर लगेचच त्रास झाला होता. परंतु, त्यातील दोघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते बरे झाले तर एकाचा मृत्यू झाला. तसेच, 18 प्रकरणांमध्ये मृत्यू हे कोरोना लशीशी निगडित नाहीत. याचबरोबर दोन प्रकरणांमध्ये पुरेशी माहिती उपलब्ध नाही.  

जगभरात कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू 

कोरोनाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू होण्याचे प्रकार जगभर आढळले आहेत. युरोपसह इतर देशांमध्ये झालेल्या मृत्यूंमध्ये आणि भारतातील मृत्यूंमध्ये मोठे साधर्म्य आहे. युरोपमध्ये लस घेतल्यानंतर होत असलेल्या मृत्यूंबद्दल युरोपियन मेडिसीन्स एजन्सीने म्हटले होते की, आरोग्यसेवक आणि इतर नागरिकांना कोरोनाची लस घेताना यामुळे होणारे दुष्परिणाम माहिती असायला हवेत. ही लस घेतल्यानंतर 2 आठवड्यांत रक्तात गुठळ्या होणे आणि रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होणे असे प्रकार समोर आले आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख