ममतांच्या विरोधात भाजपकडून नगरसेवकपदाची निवडणूक हरलेली उमेदवार?

ममतांच्या विरोधात भाजप कुणाला उमेदवारी देणार याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. यात प्रियांका टिबरेवाल यांचे नाव आघाडीवर आहे.
bjp may contest priyanka tibrewal against mamata banerjee
bjp may contest priyanka tibrewal against mamata banerjee

कोलकता : केंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील (West Bengal) तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. ममतांच्या विरोधात भाजप (BJP) कुणाला उमेदवारी देणार याची मोठी चर्चा सुरू झाली आहे. यात प्रियांका टिबरेवाल (Priyanka Tibrewal यांचे नाव आघाडीवर आहे. 

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य भाजपने सहा जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली आहेत. यात भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रियांका टिबरेवाल, विश्वजित सरकार, मेघालय व त्रिपुराचे माजी राज्यपाल तथागत रॉय आणि भवानीपूरमधून आधी निवडणूक लढलेले रूद्रनील घोष यांच्या नावाचा समावेश आहे. 

भाजपकडून प्रियांका टिबरेवाल यांना ममतांच्या विरोधात मैदानात उतरवले जाण्याची शक्यता आहे. पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका यांच्या नावाची आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. प्रियांका टिबरेवाल या मागील विधानसभा निवडणुकीत एंटली मतदारसंघात भाजपच्या उमेदवार होत्या. त्यांचा त्यावेळी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव झाला होता. याचबरोबर कोलकता महापालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत टिबरेवाल या तृणमूलच्या स्वपन सम्मादार यांच्याकडून पराभूत झाल्या होत्या. नंतर 2020 मध्ये त्यांची भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनवण्यात आले होते. 

भाजपला ममतांच्या विरोधात तगडा उमेदवार द्यायचा होता परंतु, अनेक नेत्यांना यास नकार दिला. डिपॉझिट जप्त होण्याच्या भीतीने बडे भाजप नेते ममतांच्या विरोधात मैदानात उतरण्यास तयार नाहीत. राज्यात तृणमूलच्या विजयानंतर झालेल्या हिंसाचारप्रकरणी कोलकता उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्यांमध्ये टिबरेवाल यांचा समावेश आहे. याच याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हिंसाचाराची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले होते. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते अभिजित सरकार यांच्या हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यांचे बंधू विश्वजित सरकार यांचेही नाव आता चर्चेत आहे. त्यांचे नाव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आले आहे. त्यांनीही बंगालमधील हिंसाचाराबाबत याचिका दाखल केली होती. या हिंसाचाराच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्याची मागणी त्यांनी केली होती. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बंगालमधील भवानीपूरसह समशेरगंज आणि जांगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबरला मतदान होईल. निवडणुकीचा निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com