भारतात पेट्रोल महागलय तर मग तालिबानमध्ये जा! भाजप नेत्याचा अजब सल्ला

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत.
bjp leader Ramratan Payal says go to taliban for cheap petrol
bjp leader Ramratan Payal says go to taliban for cheap petrol

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Petrol) दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. याबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांना  तालिबानध्ये (Taliban) जाण्याचा वादग्रस्त सल्ला भाजप (BJP) नेत्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. 

भाजपचे मध्य प्रदेशातील नेते रामरतन पायल यांनी हे वक्तव्य केले आहे. देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबाबत पत्रकारांनी पायल यांना प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला झापले. कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार असून, असे प्रश्न कशाला विचारता, अशी उलट विचारणा पायल यांनी केली.  मात्र, त्यावेळी या भाजप नेत्यासह त्याच्या समर्थकांपैकी एकाच्याही चेहऱ्यावर मास्क नव्हता. परंतु, ते कोरोना उपाययोजनांचे धडे देत होते. 

पायल म्हणाले की, तुम्ही तालिबानमध्ये जा. अफगाणिस्तानमध्ये पेट्रोल 50 रुपये लिटरने विकले जात आहे. तुम्ही तिकडे जाऊन पेट्रोल भरा. असेही तिथे पेट्रोल भरायला कुणी नाही. भारतात तुम्हाला सगळी सुऱक्षा आहे. कोरोनाची तिसरी लाट लवकरच येणार आहे. भारताने आधी दोन लाटांचा सामना केला आहे. तुम्ही प्रतिष्ठित पत्रकार आहात. देशातील परिस्थिती तुमच्या लक्षात येतेय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कशा पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. ते आजही देशातील 80 कोटी जनतेला मोफत रेशन देत आहेत. 

देशात पेट्रोलआणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. देशातील चार महानगरांमध्ये आज सलग 34 व्या दिवशी पेट्रोलच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. मात्र, डिझेलच्या दरात आज प्रतिलिटर 25 पैसे कपात कररण्यात आली आहे. डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी कपात झाली आहे. एलपीजी सिलिंडरची दरवाढही सुरू आहे. चालू वर्षभरात एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 165 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

जनतेच्या खिशाला कात्री 
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मागील सात वर्षांत सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावून सरकारने आपली झोळी भरुन घेतली आहे. भाजप सरकारच्या काळात पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मे 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यावेळी केंद्र सरकारचा पेट्रोलवरील प्रतिलिटर कर 10.38 रुपये होता आणि आता तो 32.90 रुपये आहे. मे 2014 मध्ये केंद्र सरकारचा डिझेलवरील प्रतिलिटर कर 4.52 रुपये होता. तो आता 31.80 रुपये आहे. म्हणजे मागील सात वर्षांत पेट्रोलवरील करात 220 टक्के आणि डिझेलवरील करात 600 टक्के वाढ झाली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com