येडियुरप्पांसाठी दोन वर्षांत दोन शब्द नाहीत पण बोम्मईंच्या पाठीवर लगेचच थाप!

कर्नाटकात बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई यांची नियुक्ती झाली.
bjp hig command appreciates decision taken by basavraj bommai
bjp hig command appreciates decision taken by basavraj bommai

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची नियुक्ती झाली. बोम्मई यांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर महिन्याच्या आतच भाजपच्या (BJP) हाय कमांडने त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. परंतु, येडियुरप्पांचे हाय कमांडने कधीही कौतुक न केल्याचा मुद्दा आता उपस्थित झाला आहे. 

बोम्मई यांनी मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार हाती घेताच त्यांच्यासमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या नेत्यांनी त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. यातच खातेवाटपात महत्वाचे खाते न मिळालेले मंत्री उघडपणे नाराजी व्यक्त करीत आहेत. असे असतानाही बोम्मईंनी धडाक्याने निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. याची दखल अखेर पक्षाच्या हाय कमांडने घेतली असून, त्यांना शाबासकी दिली आहे. 

भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल.संतोष यांनी बोम्मईंचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, कर्नाटक सरकारने याच वर्षापासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने माजी मुख्य सचिव एस.व्ही.रंगनाथ यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली आहे. मुख्यमंत्री बोम्मई आणि उच्च शिक्षणमंत्री सी.एन.अश्वथ नारायण यांनी उचललेली पावले प्रशंसनीय आहेत. 

बोम्मईंचे हाय कमांडने जाहीर कौतुक केले असले तरी येडियुरप्पांच्या नशिबी ते कधीही आले नाही, असा खेद एका ज्येष्ठ भाजप नेत्याने व्यक्त केला. ज्येष्ठ नेते म्हणाले की, येडियुरप्पा हे मुख्यमंत्री असताना भाजप नेतृत्वाने कधीही त्यांचे कौतुक केले नाही. आता बोम्मई यांचे कौतुक करण्यामागे केंद्रीय नेतृत्वाचा हेतू वेगळा आहे. केंद्रीय नेतृत्वाने ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी घडत आहेत. हे यामागील कारण आहे. 

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. राजीनाम्यानंतर केंद्रीय निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि जी.किशन रेड्डी यांनी भाजप आमदारांची बैठक घेतली होती. या बैठकीत बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. या बैठकीत येडियुरप्पाही उपस्थित होते. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com