हीच का देशभक्ती! भाजपच्या झेंड्यानं झाकला तिरंगा...

देशभक्तीच्या मुद्यावरून काँग्रेससह अनेकांवर सडकून टीका करणाऱ्या भाजपलाच आता ट्रोल केलं जात आहे.
BJP Flag Over National Flag At Kalyan Singhs Prayer Meet
BJP Flag Over National Flag At Kalyan Singhs Prayer Meet

नवी दिल्ली : देशभक्तीच्या मुद्यावरून काँग्रेससह अनेकांवर सडकून टीका करणाऱ्या भाजपलाच आता ट्रोल केलं जात आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या निधनानंतर रविवारी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळंच एक छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झालं असून त्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपवर टिकेची झोड उठवली आहे. (BJP Flag Over National Flag At Kalyan Singhs Prayer Meet)

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (वय ८९) यांचे शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास निधन झाले. कल्याण सिंह गेल्या दीड महिन्यापासून लखनऊच्या एसजीपीजीआय रुग्णालयात दाखल होते. निधनानंतर त्यांचे पार्थिव लखनऊ येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

सुरूवातीला कल्याण सिंह यांचं पार्थिव तिरंग्यानं लपेटण्यात आलं होतं. पण नंतर त्यावर भाजपचा झेंडा टाकून अर्धा तिरंगा झाकण्यात आला. हे छायाचित्र सोशल मीडियात काही वेळातच व्हायरल झालं. तिरंग्याचा अपमान केल्याचा मुद्दा उपस्थित करून अनेकांनी भाजपवर टिकेचा भडिमार केला. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीच भाजपचा झेंडा तिरंग्यावर टाकला. यावेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. 

काँग्रेसचे नेते शशी शरूर यांनीही भाजपला टोला लगावला आहे. शरूर यांनी ट्विट करत भाजपला तिरंग्याच्या अपमानाबद्दल जाब विचारला आहे. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनीही तिरंग्यावर भाजपचा झेंडा टाकणे योग्य आहे का, असा सवाल केला आहे. तिरंग्याचा हा अपमान देश सहन करणार नाही, अशी टीका युवक काँग्रेसनं केली आहे. समाजवादी पक्षाचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनीही देशापेक्षा पक्ष मोठा अन् तिरंग्यापेक्षा भाजपचा झेंडा मोठा असं म्हणत टोला लगावला आहे. 

दरम्यान, कल्याण सिंह हे भाजपचे संस्थापक नेते होते. ते राजस्थानचे राज्यपालही होते. कल्याण सिंह यांनी राम मंदिर चळवळीत महत्वाची भूमिका बजावली. कल्याण सिंह यांच्या मागे एक मुलगी प्रभा वर्मा आणि एक मुलगा राजवीर सिंह आहेत. राजवीर सिंह हे भाजपचे खासदार असून त्यांचे नातू संदीप सिंह हे यूपीच्या योगी सरकारमध्ये मंत्री आहेत. कल्याण सिंह यांचा जन्म 5 जानेवारी 1932 रोजी उत्तर प्रदेशातील अत्रौली येथे झाला होता. त्यांनी बीए आणि एलएलबीचे शिक्षण घेतले होते. कल्याण सिंह हे तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपालही बनवण्यात आले होते.

राम मंदिर आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कल्याण सिंह यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्यात आली. दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारनेही यूपीचे कल्याण सिंह यांचे सरकार बरखास्त केले. यानंतर सप्टेंबर 1997 ते नोव्हेंबर 1999 पर्यंत कल्याण सिंह यांना पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनविण्यात आले हेाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com