काबूल विमानतळावर थरार...गोळीबारात एक ठार तिघे जखमी; सर्व प्रवेशद्वारे बंद

काबूल विमानतळावरील या थरारात एक अफगाणी सुरक्षारक्षक ठार झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. यानंतर विमानतळाची सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत.
after gunfire at kabul airport all entry gates closed
after gunfire at kabul airport all entry gates closed

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबान्यांनी (Taliban) सत्ता स्थापन केली असून, हजारो अफगाणी नागरिकांसह विदेशी नागरिक देश सोडून पलायन करू लागले आहेत. काबूलच्या (Kabul Airport) विमानतळावर हजारो जणांनी विमान पकडण्यासाठी गर्दी केली आहे. यातच आज पश्चिमी देशांची सुरक्षा दले, अफगाणी सुरक्षारक्षक आणि अनोळखी व्यक्तींमध्ये गोळीबार झाला. काबूल विमानतळावरील या थरारात एक अफगाणी सुरक्षारक्षक ठार झाला असून, तिघे जखमी झाले आहेत. यानंतर विमानतळाची सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आहेत.  

जर्मनीच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, काबूल विमानतळाच्या उत्तर प्रवेशद्वारावर ही घटना घडली. तेथे अमेरिका आणि जर्मनीचे सैन्य तैनात आहे. त्यांच्या मदतीला अफगाणी सुरक्षारक्षक आहेत. विमानतळाबाहेरुन एका स्नायपरने अफगाणी सुरक्षारक्षकावर गोळीवर केला. त्यांनी याला उत्तर दिले. याचबरोबर अमेरिकी सैन्यानेही याला प्रत्युत्तर दिले. यात एक अफगाणी सुरक्षारक्षक ठार झाला तर तिघे जखमी झाले. गोळीबाराच्या या घटनेमुळे विमानतळावरील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होऊन गोंधळ उडाला. अखेर विमानतळाची सर्व प्रवेशद्वारे बंद केली आहेत. 

अफगाणिस्तानमध्ये शिल्लक असलेले अमेरिकी सैनिक विमानतळाची सुरक्षा करीत आहेत. लोकांचा लोंढा विमानतळावर येत असून, त्याला रोखणे अमेरिकी सैनिकांनी अवघड जात आहे. दरम्यान, हजारो जणांनी विमानतळावर गर्दी केल्याने गोंधळ वाढला आहे. आता तालिबानने विमानतळाबाहेर आपले सशस्त्र दल तैनात केले आहे. ते लोकांना विमानतळात जाण्यापासून रोखत आहेत. तसेच, त्यांच्यावर गोळीबार करीत आहेत. 

नुकताच काबूल विमामनतळावर उभ्या असलेल्या विमानात बसण्यासाठी गर्दी केलेल्या प्रवाशांचा व्हिडीओ समोर आला आहे. विमानात बसण्यासाठी लोक धक्काबुक्की करीत आहेत. त्याचबरोबर विमानाला लोंबकळत असल्याचे दिसत आहे. अनेक जण विमानाच्या जिन्याला लोंबकळून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करीत होते. याच परिस्थितीत अमेरिकी सैन्याच्या विमानाने उड्डाण केले होते. यामुळे विमानाला लोंबकळलेल्या चार जणांचा खाली पडून मृत्यू झाला होता. एखाद्या गर्दीच्या बसस्थानकासारखी काबूल विमानतळाची अवस्था झाली आहे. लोकांचे लोंढे विमानतळावर येत आहेत. 

तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत. ते ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले आहेत. तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. 

तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार अखेर झुकले आहे. तालिबान्यांनी 15 ऑगस्टला सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजूने काबूलला घेरण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अशरफ घनी यांनी देश सोडला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com