आधी कॅरेक्टर सर्टिफिकेट मगच भाजपमध्ये मिळणार प्रवेश; पक्षाचा मोठा निर्णय

निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपसह सर्वच पक्षांकडून इतर पक्षांतील नेत्यांना प्रवेश देण्यासाठी चढाओढ लागलेली असते. असाच एक प्रवेश भाजपच्या चांगलाच अंगलट आला.
आधी कॅरेक्टर सर्टिफिकेट मगच भाजपमध्ये मिळणार प्रवेश; पक्षाचा मोठा निर्णय
BJP on alert after inclusion of controvercial leader

नवी दिल्ली : निवडणुका जवळ आल्यानंतर भाजपसह सर्वच पक्षांकडून इतर पक्षांतील नेत्यांना प्रवेश देण्यासाठी चढाओढ लागलेली असते. असाच एक प्रवेश भाजपच्या चांगलाच अंगलट आला. एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्याला प्रवेश दिल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर या नेत्याला आठवडाभरात बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या प्रकारानंतर आता भाजप नेतृत्व सतर्क झाले असून पक्षात प्रवेश देण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. (BJP on alert after inclusion of controvercial leader)  

उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाचे नेते जितेंद्र सिंह बबलू यांना मागील आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यांच्यावर भाजपच्या खासदार रीटा बहुगुणा जोशी यांचं घर जाळण्याचा आरोप आहे. ही घटना 2009 मध्ये जोशी या काँग्रेसमध्ये असतानाची आहे. 2011 मध्ये तपासात बबलू यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना अटकही झाली होती. बबलू हे बाहूबली नेते असल्याने भाजपने त्यांना पक्षात स्थान दिलं होतं. या प्रवेशानंतर रीटा बहुगुणा यांनी जोरदार विरोध केला. आपले घर जाळणाऱ्या नेत्याला पक्षातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी दबाव वाढवला होता. त्यानंतर त्यांची सहा दिवसांतच हकालपट्टी करण्यात आली. 

या प्रकारानंतर उत्तर प्रदेशात पक्षावर चोहोबाजूने टीका झाली. पक्षातील नेत्यांनी या प्रवेशावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजप नेतृत्वाने कोणत्याही नेत्याला पक्षात घेताना त्याचे चरित्र पाहूनच प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशात स्क्रीनिंग समितीही स्थापन करण्यात आली आहे. ही समिती संबंधित नेत्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीची तपासणी करूनच त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. 

स्क्रीनिंग समितीमध्ये पाच वरिष्ठ नेत्यांचा समावेश केला जाणार आहे. ही समिती पक्षात येऊ इच्छिणाऱ्यांचा बायोडाटा तपासेल. तसेच ही समिती संबंधितांची गुन्हेविषयक माहितीही गोळा करेल. समाजात त्यांची प्रतिमा कशी आहे, याची माहितीही ही समिती घेणार आहे. सध्या या समिती सदस्यांची नावे निश्चित झालेली नाही, असे पक्षातील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

बबलू यांच्याआधीही गँगस्टर अरविंद राज त्रिपाठी यांना भाजपने भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश मंत्री केले होते. त्यानंतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्याला विरोध केला. त्यानंतर वाद निर्माण झाल्याने पक्षाला त्याचे समर्थन करण्यासाठी मोठी कवायत करावी लागली.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in