महागाईच्या मुद्द्यावर संघप्रणित संघटनेचाच मोदी सरकारच्या विरोधात एल्गार

देशात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीसोबतच जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे.
bartiya mazdoor sangh will oppose modi government
bartiya mazdoor sangh will oppose modi government

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढीमुळे महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. महागाईसह निर्गुंतवणूक आणि ताज्या चलनीकरण धोरणांवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित (RSS) भारतीय मजदूर संघाने (Bhartiya Mazdoor Sangh) मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सरकारविरोधात ९ सप्टेंबरला देशभरात निदर्शने करण्याची घोषणा भारतीय मजदूर संघाने केली आहे. 

देशात पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीसोबतच जीवनावश्यक वस्तूंचे दर कडाडले आहेत. यामुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरू आहे. अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे. यामुळे सरकारने निधी उभारण्यासाठी निर्गुंतवणुकीसोबतच राष्ट्रीय चलनीकरण वाहिकेची घोषणा केली आहे. यात महामार्ग, रेल्वे, विमान वाहतूक, वीज उत्पादन आणि पारेषण, क्रीडा संकुले, गोदाम, कोळसा खाणी, बंदरे यासारख्या सरकारी मालमत्ता खासगी क्षेत्राला वापरासाठी देऊन पुढील चार वर्षांत सहा लाख कोटी रुपये आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. 

या धोरणावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. सरकारकडून भांडवली मालमत्तांची विक्री सुरू असल्याचा आरोप होत आहे. भारतीय मजदूर संघही या विरोधात मैदानात उतरला आहे. सरकारच्या धोरणाविरोधात १ ते ८ सप्टेंबरदरम्यान जनजागरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याचबरोबर ९ सप्टेंबरला सर्व जिल्हा मुख्यालयांवर निदर्शने करण्यात येणार आहेत. 

याबाबत भारतीय मजदूर संघाचे महामंत्री विनयकुमार सिन्हा यांनी म्हटले आहे की, भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच अयोध्येत झाली. या बैठकीत महागाईविरोधात देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जनजागरण अभियान आणि निदर्शने करण्यात येणार आहेत. 

देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे नागरिक संकटात सापडले आहेत. पेट्रोलच्या दरासोबत डिझेलनेही शंभरचा टप्पा ओलांडण्यास सुरवात केली आहे. आधीच कोरोना महामारीमुळे हैराण झालेल्या नागरिकांचे या दरवाढीमुळे हाल होत आहेत. अशातच आता स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. यावर्षी एलपीजी सिलिंडरच्या दरात तब्बल 165 रुपयांची वाढ झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com