पक्षाला तोंडावर पाडणाऱ्या सुप्रियोंना मानाचं पान अन् विजयवर्गीयांना डच्चू!

मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते.
babul supriyo is star campaigner in west bengal bypolls
babul supriyo is star campaigner in west bengal bypolls

कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने (BJP) ममतांच्या विरोधात प्रियांका टिबरेवाल यांना मैदानात उतरवले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना स्थान देण्यात आले असून, पक्षाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय (Kailash Vijayvargiya) यांना वगळण्यात आले आहे. 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ उतरले होते. तरीही भाजपला पराभव पत्करावा लागला होता. आता राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. भवानीपूर या ममतांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचासाठी ही निर्णायक निवडणूक आहे. भाजपनेही ममतांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. 

भाजपने या निवडणुकीसाठी 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यात राज्याबाहेरील केवळ चार नेत्यांचा समावेश आहे. यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, हरदीपसिंग पुरी, पक्षाचे प्रवक्ते शहनवाज हुसेन आणि भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अभिनेते मनोज तिवारी यांना स्थान देण्यात आले आहे. स्टार प्रचारकांमधून पक्षाचे प्रभारी कैलास विजयवर्गीय यांना वगळण्यात आले आहे. याचवेळी खासदार बाबुल सुप्रियो यांना स्थान देण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार करताना 12 मंत्र्यांना डच्चू दिला होता. यामध्ये पश्चिम बंगालमधील भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांचाही समावेश होता. मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर सुप्रियो यांनी केलेल्या फेसबुक पोस्टवरुन गदारोळ उडाला होता. त्यांनी राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले होते. तसेच,  खासदारकीचाही राजीनामा देण्याचीही घोषणा केली होती. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतला होता. अशा प्रकारे त्यांनी पक्षालाच तोंडावर पाडले होते. 

राज्यातील प्रचाराची धुरा सुरवातीपासून विजयवर्गीय यांच्यावर होती. विधानसभा निवडणुकीवेळी विजयवर्गीय हे समर्थपणे प्रचाराची आघाडी सांभाळत होते. आता राज्यात तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. यातील भवानीपूरची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. ममता बॅनर्जींच्या भवितव्याचा फैसला ही निवडणूक करेल. परंतु, पक्षाने स्टार प्रचारकांमधून विजयवर्गीय यांना वगळले आहे. परंतु, पक्षाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या सुप्रियो यांना मात्र, स्थान देण्यात आले आहे. यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावरुन पक्षामध्येही अस्वस्थतेचे वातावरण आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com