ममतांच्या विरोधात मोदी-शहा नव्हे तर स्मृती इराणी!

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जीया भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
ममतांच्या विरोधात मोदी-शहा नव्हे तर स्मृती इराणी!
smriti irani will be star campaigner in west bengal bypolls

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) तीन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुका होत आहेत. तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या भवानीपूर (Bhawanipur) मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. भाजपने (BJP) ममतांच्या विरोधात वकील असलेल्या प्रियांका टिबरेवाल यांना मैदानात उतरवले आहे. भाजपने या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात स्मृती इराणींसह राज्याबाहेरील चार नेत्यांचा समावेश आहे. 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ उतरले होते. तरीही भाजपला पराभव पत्करावा लागला होता. आता राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. भवानीपूर या ममतांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. त्यांना मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचासाठी ही निर्णायक निवडणूक आहे. भाजपनेही ममतांचा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. 

भाजपने या निवडणुकीसाठी 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यात राज्याबाहेरील केवळ चार नेत्यांचा समावेश आहे. परंतु, नरेंद्र मोदी आणि अमित शहांचा समावेश नाही. याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, हरदीपसिंग पुरी, पक्षाचे प्रवक्ते शहनवाज हुसेन आणि भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अभिनेते मनोज तिवारी यांना स्थान देण्यात आले आहे. यामुळे आगामी सामना हा ममता विरुद्ध स्मृती इराणी असा रंगणार आहे. राज्यातील स्टार प्रचारकांमध्ये प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी, सरचिटणीस अमिताव चक्रवर्ती यांच्यासह राज्यातील खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. 

पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भवानीपूरला सोडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदिग्राममध्ये जाण्याचा निर्णय चांगलाच भोवला होता. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यात यश आले खरे पण त्यांना तेथे पराभव पत्करावा लागला. आता त्यांना पुन्हा निवडणूक लढवून विजयी होत मुख्यमंत्रिपद टिकवावे लागणार आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भवानीपूरला पसंती दिली आहे. पण भाजपनंही ममतांचा पराभव करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्य भाजपने सहा जणांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. यातील भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रियांका टिबरेवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने बंगालमधील तीन तर ओडिशामधील एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बंगालमधील भवानीपूरसह समशेरगंज आणि जांगीरपूर तर ओडिशातील पिपली मतदारसंघात 30 सप्टेंबरला मतदान होईल. निवडणुकीचा निकाल 3 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. इच्छुकांना 13 सप्टेंबरपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. 

Related Stories

No stories found.