राज्यात यायचं असेल तर आधी लस घ्या! बंधन घालणारं देशातील हे पहिलंच राज्य - Arunachal Pradesh allow entry only for vaccinated people | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

राज्यात यायचं असेल तर आधी लस घ्या! बंधन घालणारं देशातील हे पहिलंच राज्य

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 जुलै 2021

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील प्रत्येक राज्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

इटानगर : देशात कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर अनेक राज्यांनी प्रवेशासाठी आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी बंधनकारक केली होती. काही राज्यांमध्ये अजूनही ही अट आहे. पण आता राज्यांकडून लसीकरणाचे बंधन घालण्यास सुरूवात करण्यात आली आहे. असं बंधन घालणारं अरूणाचल प्रदेश पहिलं राज्य ठरलं आहे. यापुढे या राज्यात लस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. (Arunachal Pradesh allow entry only for vaccinated people)

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील प्रत्येक राज्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अरूणाचल प्रदेशने महत्वाचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिका नागरिकांचे लसीकरण करण्याबरोबरच राज्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांपासून संसर्ग रोखण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळं अन्य राज्यांतून येणाऱ्यांना लस घेतलेली असणं बंधनकारक करण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी दिली आहे.

हेही वाचा : भाजपसमोर तिढा; शपथविधी झाला पण खातेवाटपावरून वाद वाढला

गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांसोबत ईशान्येकडील राज्यांतील मुख्य सचिवांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत नरेश कुमार यांनी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना ही माहिती दिली. संसर्ग रोखण्यासाठी राज्यात ट्रॅकिंग, टेस्टिंग, निर्णयांची कठोर अंमलबजावणी आणि लसीकरणावर भर दिला जात आहे. अरूणाचल प्रदेशातील 68 टक्क्यांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत लस देण्यात आली आहे. 

यावेळी कुमार यांनी राज्यात येणाऱ्या नागरिकांना प्रवेश करण्यापूर्वी लस घेतलेली असणे बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले. तसेच राज्याला अतिरिक्त तीन लाख लशींची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, मंगळवारी देशातील 17 राज्यांतील 73 जिल्ह्यांचा 29 जून ते 5 जुलै या कालावधीतील पॅाझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांहून अधिक होता. त्यामुळं या जिल्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. 

या 17 राज्यांपैकी 8 राज्य ईशान्येकडील आहेत. देशातील 73 जिल्ह्यांपैकी 18 जिल्हे अरूणाचल प्रदेशातील आहेत. मणीपुरमधील 9, मेघालयातील 6, त्रिपुरातील 4, सिक्कीममधील 4, ओडिशातील 3, नागालँडमधील 3 आणि आसाम व मिझोराममधील अनुक्रमे दोन व एका जिल्ह्याचा समावेश आहे. अरूणाचल हे लशीचे बंधन घालणारे पहिले राज्य ठरले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख