मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. गोस्वामी यांचा कागदोपत्री तुरुंगात मुक्काम होता मात्र, त्यांचा प्रत्यक्षातील मुक्काम अलिबागमधील महापालिकेच्या शाळेत होता. त्यावेळी गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे आढळून आले होते. गोस्वामींना मोबाईल वापरण्यास देणाऱ्या कारागृह अधीक्षकांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.
गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून मागील वर्षी 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना कारागृहात हलवण्याची प्रक्रिया कागदोपत्री करण्यात आली. प्रत्यक्षात कोरोनाच्या उपाययोजनांमुळे त्यांना कारागृहात नेण्यात आले नाही. त्यांना अलिबाग महापालिकेच्या शाळेत ठेवण्यात आले होते. अलिबाग कारागृह प्रशासनाने कोरोनामुळे विलगीकरणाची व्यवस्था शाळेत केली होती.
अलिबाग पोलीस ठाण्यापासून सुमारे 15 मिनिटे अंतरावर ही शाळा आहे. या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. इतर कोणालाही शाळेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली होती. कोणत्याही आरोपीला तुरुंगात पाठवण्याआधी आता या शाळेत विलगीकरणात ठेवले जाते. गोस्वामी यांच्यासोबतच्या इतर दोन आरोपींनाही याच शाळेत ठेवण्यात आले होते.
गोस्वामी अन् त्यांची पत्नी अडचणीत; पोलीस उपायुक्त त्रिमुखेंकडून अब्रुनुकसानीचा दावा
मात्र, दुसऱ्या दिवशी 5 नोव्हेंबरला सकाळी शाळेत गोस्वामी हे मोबाईल वापरत असताना सापडले होते. त्यामुळे त्यांची रवानगी तळोजा तुरुंगात करण्यात आली. या विषयी रायगड पोलिसांनी म्हटले होते की, गोस्वामी हे न्यायालयीन कोठडीत असताना कोणाचा तरी मोबाईल घेऊन सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्याचे समोर आले. वरळीतील निवासस्थानातून गोस्वामींना अटक करताना पोलिसांनी त्यांच्या मोबाईलही जप्त केला आहे. यामुळे अलिबाग कारागृहाच्या अधीक्षकांना आम्ही पत्र दिले. न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी मोबाईल कसा वापरतो, असा प्रश्न आम्ही विचारला होता. यामुळे त्यांनी गोस्वामी यांना तातडीने तळोजा तुरुंगात हलवले.
या प्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत अलिबाग जिल्हा कारागृहाचे अधीक्षक अंबादास पाटील हे दोषी आढळले असून, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ही चौकशी आर्थर रोड कारागृहाच्या अधीक्षकांनी केली होती. यात पाटील यांनी बेकायदा पद्धतीन गोस्वामींना मोबाईल वापरण्यास मोबाईल दिल्याचे निष्पन्न झाले. पाटील हे गोस्वामींना मोबाईल देत असताना एका कारागृह रक्षकाने पाहिले होते. याचबरोबर पाटील याचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर या प्रकरणातील सर्व सत्य बाहेर आले.
Edited by Sanjay Jadhav

