गोस्वामी अन् त्यांची पत्नी अडचणीत; पोलीस उपायुक्त त्रिमुखेंकडून अब्रुनुकसानीचा दावा - mumbai dcp abhishek trimukhe files defamation case against arnab goswami | Politics Marathi News - Sarkarnama

गोस्वामी अन् त्यांची पत्नी अडचणीत; पोलीस उपायुक्त त्रिमुखेंकडून अब्रुनुकसानीचा दावा

वृत्तसंस्था
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांची पत्नी आता पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. 

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. मुंबईतील पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी गोस्वामी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीची खटला दाखल केला आहे. गोस्वामी यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बदनामी केल्याचा दावा त्रिमुखे यांनी केला आहे. 

त्रिमुखे यांनी मुंबईतील सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. यात त्यांनी रिपब्लिक टीव्हीची पालक कंपनी एआरजी आऊटलियर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, अर्णब गोस्वामी आणि त्यांची पत्नी यांच्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहेत. गोस्वामी यांची पत्नी या कंपनीची संचालिका आहे. 

गोस्वामी यांनी त्रिमुखे यांच्याबद्दलची चुकीची माहिती काही ट्विटमध्ये दिली. तसेच, त्यांनी महाराष्ट्र सरकारबद्दलही चुकीची माहिती दिली होती, असा दावा करण्यात आला आहे. हा खटला दाखल करण्यास त्रिमुखे यांना राज्य सरकारच्या गृह विभागाने परवानगी दिली आहे. भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 499, 500, 501 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. यात अब्रुनुकसानी आणि बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करणे असे आरोप करण्यात आले आहेत. 

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात गोस्वामींनी खोटी, चुकीची आणि बदनामीकारक माहिती दिली. ही बदनामीकारक माहिती रिपब्लिक टीव्हीवरुन प्रसारित करण्यात आली होती. त्रिमुखे यांच्यावर संशय घेण्यात आला तसेच, मुंबई पोलिसांचीही बदनामी करण्यात आली होती, असे या खटल्यात म्हटले आहे. 

दरम्यान, बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती. 

दासगुप्तांच्या जामिनावर उच्च न्यायालयासमोर नुकतीच सुनावणी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार कोण आणि यात दासगुप्तांची भूमिका काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला होता. यावर सरकारी वकिलांना आरोपपत्रात दासगुप्ता हेच सूत्रधार असल्याचे सांगितले. या प्रकरणातील मास्टरमाईंड अर्णब गोस्वामी आहेत, असे दासगुप्तांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते.    

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख