अर्णब गोस्वामी सुनावणीला पुन्हा गैरहजर...अखेर न्यायालयानं दिली तंबी! - alibaug court directs arnab goswami and other accused persons to appear | Politics Marathi News - Sarkarnama

अर्णब गोस्वामी सुनावणीला पुन्हा गैरहजर...अखेर न्यायालयानं दिली तंबी!

वृत्तसंस्था
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

अर्णब गोस्वामी हे कारागृहात असताना त्यांना मोबाईल वापरण्यासाठी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. 

मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गोस्वामी यांच्यासह तिन्ही आरोपी सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहिले नाहीत. यामुळे न्यायालयाने आरोपींच्या वकिलांना सक्त ताकीद देत सर्व आरोपींना 10 मार्चला हजर राहण्यास बजावले आहे. यामुळे गोस्वामींना पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. 

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून मागील वर्षी 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. त्यानंतर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला होता. 

अन्वय नाईक प्रकरणाची सुनावणी अलिबाग न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सारडा हे आरोपी आहेत. कालच्या (ता.6) सुनावणीवेळी हे तिन्ही आरोपी न्यायालयात हजर नव्हते. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेतली. या तिन्ही आरोपींना पुढील सुनावणीवेळी 10 मार्चला हजर राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. याचबरोबर ते न्यायालयात हजर न राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. 

गोस्वामींना मोबाईल वापरायला देणं पडलं महागात...कारागृह अधीक्षक निलंबित

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या आत्महत्येप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत आहे, असे अन्वय या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. हा तपास नंतर बंद करण्यात आला होता. मागील वर्षी मे महिन्यात अन्वय यांची कन्या अज्ञा नाईक हिने हा तपास नीट झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशीचा आदेश दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख