म्युकरमायकोसिसला स्टेरॉईड्सचा अतिवापर कारणीभूत; 'एम्स'च्या प्रमुखांनी सांगितली कारणे

देशातील कोरोनाचा कहर वाढत असून, यात आता म्युकरमायकोसिस नवीन आजाराची भर पडली आहे.
AIIMS director randeep guleria says high dose of steroids can lead to mucormycosis
AIIMS director randeep guleria says high dose of steroids can lead to mucormycosis

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा (Covid19) कहर वाढत असून, यात आता नवीन आजाराची भर पडली आहे. काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस (Mucormycosis) हा जीवघेणा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना होत आहे. या आजाराचे रुग्ण देशभरात वेगाने वाढू लागले असून, अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ.रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) यांनी यासाठी स्टेरॉईड्सचा (Steroids) अतिवापरास जबाबदार धरले आहे. 

डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, म्युकरमायकोसिस होण्यामागील प्रमुख कारण हे स्टेरॉईड्सचा गैरवापर हे आहे. कोरोनाबाधित, मधुमेह आणि इतर रुग्ण स्टेरॉईड्स घेत आहेत. यामुळे त्यांना बुरशीजन्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे. हे रोखण्यासाठी आपल्याला तातडीने स्टेरॉईड्सचा गैरवापर थांबवायला हवा. हा आजार तोंड, नाक, डोळ्याची बुबुळे आणि मेंदूवर परिणाम करु शकतो. यामुळे दृष्टी जाऊ शकते आणि तो फुफ्फुसातही पसरू शकतो.  

कोरोनाच्या या लाटेत उपचारासाठी स्टेरॉईड्सचा वापर वाढला आहे. सौम्य लक्षणे असताना अथवा आजाराच्या सुरवातीला टप्प्यात स्टेरॉईड्सचे मोठे डोस दिले जात आहेत. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असून, म्युकरमायकोसिस होण्याची शक्यता आणखी बळावत आहे. गरज नसताना अथवा सौम्य लक्षणे किंवा आजाराच्या सुरवातीच्या टप्प्यात स्टेरॉईड्स दिल्याने हा संसर्ग होत आहे. हा आजार रोखण्यासाठी प्रथम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवायला हवे. स्टेरॉईड्सवर असणाऱ्या व्यक्तींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. याचबरोबर त्यांना स्टेरॉईड देताना काळजी घ्यावी, असा सल्ला गुलेरिया यांनी दिला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आपण रुग्णालयात संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काळजीपूर्वक पद्घतीने नियम पाळायला हवेत. बुरशी आणि जिवाणू संसर्गाची अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे, असे डॉ. गुलेरिया यांनी सांगितले. 

देशात 24 तासांत 4 हजार 209 जणांचा मृत्यू 
देशात मागील 24 तासांत 2 लाख 59 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 4 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे याच काळात बरे होऊन रुग्णालयातून बाहेर पडलेल्या रुग्णांची संख्या साडेतीन लाख आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2 कोटी 60 लाख 31 हजार 991 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 91 हजार 331 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

Edited by Sanjay Jadhav 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com