भाजपसमोर तीन पर्याय : नवीन मुख्यमंत्री, राष्ट्रपती राजवट अथवा मध्यावधी निवडणुका

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, राज्यात मुख्यमंत्रिपदी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे.
after vijay rupani resign bjp have three options in gujarat
after vijay rupani resign bjp have three options in gujarat

गांधीनगर : गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री (Chief Minister) विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे भाजपसमोर (BJP) आता तीन पर्याय आहेत. यातील कोणता पर्याय पक्ष निवडणार याबाबत उत्सुकता आहे. 

रुपानी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असून, पर्यायाने मंत्रिमंडळानेही राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. यामुळे सत्ताधारी भाजपसमोर तीन पर्याय आहेत. यातील पहिला पर्याय नवीन मुख्यमंत्री निवडण्याचा आहे.  भाजपकडून हाच पर्याय स्वीकारला जाण्याची सर्वाधिक शक्यता आहे. दुसरा पर्याय हा राष्ट्रपती राजवटीचा आहे. राज्यात बहुमतात असताना निवडणुकीआधी वर्षभर राष्ट्रपती राजवट लावणे भाजपला महागात पडू शकते. यामुळे हा पर्याय पक्ष नेतृत्वाकडून निवडला जाण्याची शक्यता अतिशय कमी आहे. 

भाजपसमोर तिसरा पर्याय हा मध्यावधी निवडणुकीचा आहे. राज्यात सरकारविरोधात जनमत असल्यास ते आणखी वाढून त्याचा फटका बसू नये, यासाठी हा पर्याय निवडला जाऊ शकतो. भाजप नेतृत्वाचे आतापर्यंतचे धक्कातंत्र पाहता हा पर्याय निवडला जाण्याची शक्यताही दिसत आहे. परंतु, पुढील वर्षी इतर राज्यांतही विधानसभा निवडणूक असल्याने एकट्या गुजरातमध्ये मध्यावधी निवडणुका घेण्याचा धोका भाजप पत्करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने उद्या (ता.12) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी भाजप संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष,  गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. गांधीनगर येथे उद्या होणाऱ्या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना तातडीने बोलावण्यात आले आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. या नावाचीही उद्याच घोषणा केली जाईल. 

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन आज राजीनामा सोपवला. गांधीनगरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. 

रूपानी यांच्या जागी कोण येणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल. पक्ष नवीन मुख्यमंत्री निवडेपर्यंत पटेल हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. याआधी भाजपशासित काही राज्यांमध्येही कार्यकाळ पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यात कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून बी.एस.येडियुरप्पा यांना तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदावरुन तिरथसिंह रावत यांना पायउतार व्हावे लागले होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com