गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची माळ मनसुख मांडवीयांच्या गळ्यात?

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, राज्यात मुख्यमंत्रिपदी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे.
mansukh mandaviya may be next gujarat chief minister
mansukh mandaviya may be next gujarat chief minister

गांधीनगर : गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री (Chief Minister) विजय रुपानी (Vjay Rupani) यांच्यासह मंत्रिमंडळाने तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार असून, राज्यात मुख्यमंत्रिपदी कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे. यात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांचे नाव आघाडीवर आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपने उद्या (ता.12) विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी भाजप संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष,  गुजरातचे प्रभारी भूपेंद्र यादव उपस्थित राहणार आहेत. गांधीनगर येथे उद्या होणाऱ्या बैठकीसाठी पक्षाच्या सर्व आमदारांना तातडीने बोलावण्यात आले आहे. या बैठकीत नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. या नावाचीही उद्याच घोषणा केली जाईल. 

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. मांडवीय गुजरातमधील भावनगरचे आहेत. ते गुजरात विधानसभेवरही निवडून गेले होते. ते राज्यातून राज्यसभेवर गेले आहेत. मांडवीय हे काही वेळापूर्वी रूपानी यांच्या निवासस्थानीही दाखल झाले आहेत. मांडवीय यांना नुकतीच केंद्रात राज्यमंत्रिपदावरून कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली होती. कोरोना संकटाच्या काळात त्यांच्यावर अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मूळ राज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपचा मुख्यमंत्री पायउतार होणे अनपेक्षित होते. असे असताना रूपानी यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे जाऊन आज राजीनामा सोपवला. गांधीनगरमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. रूपानी यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. 

सध्या उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाईल. पक्ष नवीन मुख्यमंत्री निवडेपर्यंत पटेल हे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. याआधी भाजपशासित काही राज्यांमध्येही कार्यकाळ पूर्ण होण्याआधी मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. यात कर्नाटक, उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावरून बी.एस.येडियुरप्पा यांना तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदावरुन तिरथसिंह रावत यांना पायउतार व्हावे लागले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com