चिराग पासवान भावुक होऊन म्हणाले, अखेर मी अपयशी ठरलो! - after revolt in party ljp leader chirag paswan says he failed | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

चिराग पासवान भावुक होऊन म्हणाले, अखेर मी अपयशी ठरलो!

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याविरोधात त्यांचे काका खासदार पशुपतीकुमार पारस यांच्यासह पाच खासदारांनी बंड केले आहे. 

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात त्यांचे काका खासदार पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांच्यासह पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले आहे. चिराग यांनी तातडीने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावून काकांसह पाचही खासदारांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर चिराग यांनी भावनिक होऊन सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.  

चिराग यांनी ट्विटवर म्हटले आहे की, मी माझे कुटुंब आणि माझ्या वडिलांना निर्माण केलेला पक्ष एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मी अपयशी ठरलो. पक्ष हा मातेप्रमाणे असून, मातेची कधीही फसवणूक करु नये. लोकशाहीत लोक हेच राजे असतात. पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. 

चिराग यांनी या ट्विटसोबत एक पत्रही जोडले आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या काकांना होळीदिवशी लिहिले होते. मला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केल्यानंतर पारस हे नाराज होते आणि माझा चुलतभाऊ प्रिंस राज यांना प्रदेशाध्यक्ष केल्याबद्दलही ते खूष नव्हते, असे चिराग यांनी या पत्रात म्हटले आहे. प्रिंस राज हे आता पारस यांच्या गटात आहेत. 

रामविलास पासवान हे जिवंत होते त्यावेळी त्यांच्यावर टीका करणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या नेत्यांना पारस यांनी कधीही उत्तर दिले नाही, असेही चिराग यांनी पत्रात म्हटले आहे. प्रिंस राज यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा आणि रामविलास पासवान यांच्या अंत्यसंस्कारासाठी पारस यांनी 25 लाख रुपये घेतल्याचा उल्लेखही या पत्रात आहे. 

हेही वाचा : काकांनी पुतण्याची पक्षाच्या अध्यपदावरुन केली हकालपट्टी 

दरम्यान, चिराग यांनी आज अतिशय वेगाने पावले उचलत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांनी काका पारस यांच्यासह पाचही खासदारांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय या बैठकीत घेतला. यामुळे आता लोक जनशक्ती पक्षात संभ्रमाचे वातावरण आहे. हा वाद न्यायालयात जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. परंतु, सध्या तरी चिराग यांनी बाजी मारल्याचे दिसत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. याबद्दल पक्षाचे नेते राजू तिवारी म्हणाले की, पक्षाच्या खासदारांनी विश्वासघात केला असून, पक्षात प्रत्येक निर्णय घेण्याची एक प्रक्रिया असते आणि तिचे पालन करावे लागते.  

चिराग यांच्याविरूद्ध पशुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर या पाच खासदारांनी बंड केले आहे. चिराग यांच्यासह पक्षाचे लोकसभेत सहा खासदार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांनी त्यांचा लोकसभेत वेगळा गट मानावा, अशी मागणी केली आहे. चिराग पासवान यांच्याऐवजी दुसरा नेता नेमण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख