काकांचे बंड यशस्वी..पुतण्या चिरागची पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी - chirag paswan removed from post of lok janshakti party president | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

काकांचे बंड यशस्वी..पुतण्या चिरागची पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जून 2021

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी केलेले बंड यशस्वी झाले आहे. 

पाटणा : लोक जनशक्ती पक्षाचे (Lok Janshakti Party) अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्याविरोधात पक्षाच्या पाच खासदारांनी (MP) बंड (Revolt) केले आहे. त्यामुळे या खासदारांनी लोकसभेत (Loksabha) चिराग पासवान यांच्याऐवजी त्यांचे काका पशुपतीकुमार पारस (Pashupati Kumar Paras) यांना पक्षाचा नेता निवडले आहे. आता पारस यांनी पक्षाच्या बंडखोर खासदारांची बैठक बोलावून चिराग यांची पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. 

चिराग पासवान हे लोक जनशक्ती पक्षाचे संसदीय नेते, संसदीय मंडळाचे अध्यक्ष आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आता चिराग यांची पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सूरज भान यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नवीन अध्यक्षांची निवड होईपर्यंत भान हे अध्यक्ष राहतील. या आठवड्याच्या अखेरपर्यंत पूर्ण पक्षाचा ताबा पारस यांच्याकडे येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

चिराग यांच्याविरूद्ध पशुपती पारस पासवान (काका), प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर या पाच खासदारांनी बंड केले आहे. चिराग यांच्यासह पक्षाचे लोकसभेत सहा खासदार आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळापासून हे सर्व खासदार चिराग पासवान यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.  लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांनी त्यांचा लोकसभेत वेगळा गट मानावा, अशी मागणी केली आहे. चिराग पासवान यांच्याऐवजी दुसरा नेता नेमण्याची मागणी त्यांनी केली आहे.यामुळे पक्षाचे नेते आणि संसदीय नेते अशी दोन्ही पदेही चिराग यांच्याकडून काढून घेतली जातील, असे सूत्रांनी सांगितले.   

हेही वाचा : नितीशकुमारांनी सूड उगवला...चिराग पासवानांची अवस्था ना घरका ना घाटका 

लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे मागील वर्षी निधन झाले. त्यानंतर पक्षाची धुरा त्यांचे पुत्र चिराग पासवान यांच्याकडे आली. आता रामविलास पासवान यांच्या निधनानंतर वर्षभरातच पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे. ही फूट पाडण्याचे सूत्रधार दुसरे-तिसरे कुणी नसून, चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस आहेत. पशुपती हे रामविलास यांचे लहान बंधू आहेत. 

पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंड केल्याने चिराग यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्यांनी दिल्लीत या राजकीय घडामोडी सुरू असताना तातडीने काका पशुपतींचे घर गाठले. परंतु त्यांचे काका घराबाहेर आलेच नाही. त्यामुळे काही काळ मोटारीत प्रतीक्षा करुन चिराग तेथून परतले. 

पशुपती आणि चिराग यांच्यात मागील काही काळापासून बेबनाव आहे. ते अनेक दिवसांपासून एकमेकांशी बोलत नसून, ते पत्रव्यवहाराद्वारे संवाद साधत आहेत. पशुपती हे पहिल्यांदाच खासदार म्हणून हांजीपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आता या काका आणि पुतण्याच्या वादामुळे बिहारमधील राजकारण ढवळले गेले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख