'डिनर डिप्लोमसी'तूनच सोनिया गांधी देणार पक्षातील बंडखोरांना उत्तर

सिब्बल यांच्यासह जी-23 मधील नेत्यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणून शक्तिप्रदर्शन केले. यातून त्यांनी गांधी परिवारालाच आव्हान दिल्याचे मानले जात होते.
after kapil sibal now sonia gandhi invites opposition leaders
after kapil sibal now sonia gandhi invites opposition leaders

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांच्या घरी नुकत्याच आयोजित मेजवानीला 15 विरोधी पक्षांचे सुमारे 45 नेते एकत्र आले होते. या वेळी सिब्बल यांच्यासह जी-23 मधील नेत्यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणून शक्तिप्रदर्शन केले. यातून त्यांनी गांधी परिवारालाच आव्हान दिल्याचे मानले जात होते. यावर आता थेट सोनिया गांधींनी (Sonia Gandhi) विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मेजवानीचे नियोजन केले  आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे सूप गोंधळातच वाजले. राज्यसभेत महिला खासदारांना झालेल्या मारहाणीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक झाले आहेत. सरकारच्या विरोधक एकवटू लागले असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांना निमंत्रित केले आहे. या बैठकीची तारीख अद्याप ठरलेली नाही.  हे नेते सकाळी की रात्री मेजवानीसाठी भेटणार हे त्यांच्या कार्यक्रमानुसार ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

सोनिया गांधी या सर्वसाधारणपणे संसद आणि सार्वजनिक कार्यक्रमात कमी दिसतात. परंतु, मंगळवारी आणि बुधवारी त्यांनी संसदेच्या कामकाजाला हजेरी लावली होती. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमाला त्या पक्षाचे नेते अधीररंजन चौधरी यांच्यासमवेत उपस्थित होत्या. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनीही आज त्यांच्या संसदेतील दालनात विरोधी पक्षांची बैठक घेतली. यामुळे सिब्बल यांच्या बैठकीनंतर काँग्रेसमध्ये वेगाने घडामोडी घडू लागल्याचे दिसत आहे. 

सिब्बल यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेत्यांनी मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले होते. सिब्बल हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना नाराजीचे पत्र लिहिलेल्या 23 नेत्यांपैकी एक आहेत. यातील सर्व नेते या मेजवानीला उपस्थित होते.  या नेत्यांकडून काँग्रेस नेतृत्वाबाबत नेहमी वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता वाढदिवसाच्या मेजवानीतच पक्षाच्या नेतृत्वावर विरोधी पक्षातील नेत्यांनीही चर्चा केली आहे. काँग्रेसच्या कार्यपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता आणि काँग्रेसला सक्षम अध्यक्ष मिळणे हे दोन महत्वाचे मुद्दे या बैठकीच्या अजेंड्यावर राहिले. 

काँग्रेसच्या जी-23 मधील गुलाम नबी आझाद, शशी थरूर, भूपेंद्रसिंह हूडा, आनंद शर्मा, मनिश तिवारी आणि पी.चिदंबरम आदी नेते उपस्थित होते. या वेळी विरोधी पक्षांतील शरद पवार व संजय राऊत यांच्यासह राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, डीएमकेचे तिरूची सिवा, आरएलडीचे जयंत चौधरी, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, अकाली दलाचे नरेश गुजराल आदी नेते उपस्थित होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com