देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 74 वर्षांनी प्रथमच डावे फडकवणार तिरंगा!

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 74 वर्षांनी प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तिरंगा फडकवणार आहे.
after 74 years of independence cpm will hoist tricolour
after 74 years of independence cpm will hoist tricolour

कोलकता : देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 74 वर्षांनी प्रथमच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPM) तिरंगा (Tricolour) फडकवणार आहे. पक्षाच्या देशभरातील कार्यालयात यंदा स्वातंत्र्यदिनी पक्षाच्या झेंड्याऐवजी तिरंगा फडकविण्यात येईल. पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.  

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा केंद्रीय समितीची तीन दिवसीय बैठक नुकतीच झाली. स्वातंत्र्यदिनी पक्ष कार्यालयात तिरंगा फडकवण्याचा प्रस्ताव या बैठकीत मांडण्यात आला. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी पक्ष कार्यालयांत तिरंगा फडकवण्याची घोषणा केली. याचबरोबर पक्षाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. स्‍वातंत्र्यलढ्यातील डाव्यांच्या योगदानाची माहिती देण्यासाठी एक मोहीमही सुरू करणार आहे. 

स्वातंत्र्यलढ्यात भाजपचा सहभाग नव्हता पण डाव्यांचा मोठा सहभाग होता हे ठसवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याविषयी बोलताना पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य सुजन चक्रवर्ती म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांचे मोठे योगदान आहे. परंतु, कम्युनिस्टांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक मोहीम नंतर राबवण्यात आली. भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले पण जनतेला आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नाही, अशी कम्युनिस्टांची भूमिका होती. 

पक्षाचे अधिवेशन पुढील वर्षी एप्रिलमध्ये केरळात होणार आहे. या दिशेने पक्षाने आतापासूनच नियोजन केले आहे. पक्षाचे नेते रवीन देव म्हणाले की, डाव्यांच्या सभांमध्ये आधी तिरंगा फडकवला जात असे. आता आम्ही 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पक्ष कार्यालयात तिरंगा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक सर्व पक्ष कार्यालयांना पाठवण्यात आले आहे. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विभाजन होण्यापूर्वी तो बी.टी.रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली होती. त्यावेळी पक्षाने हे स्वातंत्र्य खोटे असल्याचे म्हटले होते. यावरुन डावे टीकेचे धनी झाले होते. नंतर सत्तरीच्या दशकाच्या मध्यात पश्‍चिम बंगालमध्ये माकपच्या नेतृत्वाखाली डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी स्वातंत्र्यदिनी कोणत्याही शासकीय किंवा पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये तिरंगा फडकावणे टाळले होते. यावर सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर मंत्रालयासमोर होणाऱ्या सरकारी कार्यक्रमात १९८२ पासून तिरंगा फडकवण्यास सुरुवात केली होती. 

स्वातंत्र्यदिनी डावे पक्ष त्यांच्या कार्यालयांमधील कार्यक्रमात पक्षाचा लाल बावटा फडकवितात. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर डाव्यांच्या कार्यालयांमध्ये या दिवशी एका वेगळ्या स्तंभावर तिरंगाही फडकवण्यात येतो. काही वर्षांपूर्वी पक्षाच्या युवा आघाडीने स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवण्यास सुरूवात केली. भाजपच्या प्रचारकी राष्ट्रवादाला तोंड देताना डावे तरुणही काही कमी राष्ट्राभिमानी नाहीत, हे दाखवण्याचा हा प्रयत्न होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com