अध्यक्षांनी पळून जाताना चार कार अन् हेलिकॉप्टरमध्ये भरून पैसे नेले!

तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी देश सोडून पळाले आहेत.
afghanistan president fled with 4 cars and helicopter full of cash
afghanistan president fled with 4 cars and helicopter full of cash

काबूल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानने (Taliban) सत्ता स्थापन केली आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाऊल ठेवताच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी (Ashraf Ghani) देश सोडून पळाले आहेत. ते जाताना चार कार आणि हेलिकॉप्टरमध्ये पैसे भरून नेले. त्यातही पैसे न बसलेले पैसे ते तेथेच सोडून गेल्याचे वृत्त रशियाच्या 'आरआयए' वृत्तसंस्थेने दिले आहे. 

काबूलमधील रशियाच्या दूतावासातील अधिकारी निकिता इश्चेंको यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. 'आरआयए'ने दिलेल्या वृत्तानुसार, अध्यक्ष घनी यांनी चार कारमध्ये पैसे भरले होते. तसेच, हेलिकॉप्टरमध्येही पैसे  भरले होते. तरीही काही पैसे शिल्लक राहिले होते. घनी हे पैसे भरलेल्या चार मोटारी आणि हेलिकॉप्टर घेऊन निघून गेले. शिल्लक पैसे तेथेच विमानतळावर पडले होते.  

अफगाणिस्तानमधून पळालेले घनी ताजिकिस्तानमध्ये आश्रयास गेले होते. तेथे त्यांच्या विमानास उतरण्यास नकार मिळाला. ताजिकीस्तानचे दरवाजे बंद झाल्याने घनी हे ओमानमध्ये तात्पुरते आश्रयास गेले आहेत. ते तेथून अमेरिकेत जाण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांच्यासमोर आश्रयासाठी शेवटचा पर्याय अमेरिकाच आहे. दरम्यान, देशाला संकटात वाऱ्यावर सोडून घनी पळाल्याने त्यांच्या विरोधात जनतेत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 

तालिबान्यांनी अध्यक्षीय भवनावर कब्जा मिळवत अफगाणिस्तानात आपली सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे लोकनियुक्त सरकार जाऊन आता अफगाणिस्तान तालिबान्यांच्या हातात गेलं आहे. तालिबानचा कमांडर मुल्ला अब्दुल गनी बरदार अफगाणिस्तानचा नवा प्रमुख असू शकतो. तालिबानच्या दहशतीसमोर अफगाणिस्तान सरकार अखेर झुकले आहे. 

तालिबान्यांनी रविवारी (ता.15) सकाळी राजधानी काबूलमध्ये पाय ठेवले आहेत. सर्वबाजूने काबूलला घेरण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. तालिबान्यांनी काबूलमध्ये पाय ठेवताच अफगाण सरकार घाबरले होते. त्यांनी चर्चेतून सत्ता परिवर्तनासाठी आवाहन केले होते. त्यानुसार अध्यक्षीय भवनात याबाबत चर्चा होणार होती. मात्र त्यापूर्वीच अशरफ घनी यांनी देश सोडला. रक्तपात टाळण्यासाठी देश सोडत असल्याचे त्यांनी म्हटले होते. 

अफगाणिस्तानमध्ये 20 वर्षांपासून असलेले अमेरिकेचे सैन्य तेथून परतल्यानंतर पुन्हा एकदा तालिबानने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अध्यक्ष बायडन यांनी अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे संपूर्ण सैन्य माघारी बोलावण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत ठरवली होती. त्याआधी दोन आठवडे तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळवला आहे. या घडामोडींमुळे जगभरातील अनेक देशांनी गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com