कुणी योगाच्या जागी कुंग फू करत असेल तर तो चिनी गुप्तहेरच! - activist disha ravi advocate slams delhi police over her arrest | Politics Marathi News - Sarkarnama

कुणी योगाच्या जागी कुंग फू करत असेल तर तो चिनी गुप्तहेरच!

वृत्तसंस्था
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट'मुळे चर्चेत आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली. 

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट'मुळे चर्चेत आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिच्या जामीन याचिकेवरील निर्णय दिल्लीतील न्यायालयाने राखून ठेवला. न्यायालय याबाबत मंगळवारी (ता.२3) आदेश सुनावणार आहे. या सुनावणीवेळी दिशाच्या वकिलांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले. तसेच, न्यायालयानेही पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती केली. 

शेतकऱ्यांशी संबंधित 'टूलकिट'मुळे प्रजासत्ताक दिनी हिंसाचार झाला, हे दर्शविणारे कोणतेही पुरावे समोर आले नसल्याचा दावा दिशाचे वकील सिद्धार्थ अगरवला यांनी सुनावणीवेळी केला. दिल्लीत हिंसाचार झाला त्यावेळी आंदोलक 'टूलकिट'ची कॉपी खिशात ठेवून आले होते का? हिंसाचारासाठी 'टूलकिट' जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही, असे अगरवाल यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आंदोलनास आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करणे हा देशद्रोह असेल तर मी तुरुंगामध्येच चांगली आहे, असेही दिशाने सुनावणीदरम्यान सांगितले. 

अगरवाल न्यायालयाला म्हणाले की, चहा आणि योगाला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वेगळे मत मांडणे हा गुन्हा आहे का? आपण आता वेगळे मत मांडणाऱ्यांवर बंदी घालणार आहोत का? कुणी योगाच्या ऐवजी कुंग फू करत  असेल तर तो चिनी गुप्तहेर असणारच, असा प्रकार पोलिसांकडून सुरू आहे. काश्मीरमधील अत्याचारावर अनेक वर्षे चर्चा होत आहे. त्याविषयी बोलणे राजद्रोह कसे होऊ शकते?  

हेही वाचा : मंदिरासाठी दरोडेखोरांकडून देणगी मागितली तर मीही दरोड्यात सहभागी का? 

दिशाच्या जामिनावरील सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पोलिसांना धारेवर धरत काही प्रश्न विचारले. 'टूलकिट' म्हणजे नेमकं आहे तरी काय? त्यामुळेच 26 जानेवारीला हिंसाचार झाला याचे पुरावे तुमच्याकडे आहेत का? समजा मी एका आंदोलनाशी जोडला गेलो आहे आणि याच उद्देशाने इतरांना भेटत असेल तर मलाही तुम्ही त्यांच्यातील समजाल काय? असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले. 

दिल्ली पोलिसांनी सुनावणीदरम्यान दिशाच्या जामीन याचिकेला विरोध केला. खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींसोबत मिळून दिशाने टूलकिट तयार केले. भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या कारस्थानाचाच तो एक मोठा भाग आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

दिशाला तिच्यावर होणाऱ्या कारवाईची आधीच माहिती होती. यामुळे तिने व्हॉट्सॲप ग्रुप, ई-मेल आणि अन्य पुरावे नष्ट केले, असा आरोप पोलिसांनी केला. दिशाच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले. दिशाचे पोएटिक जस्टीस फाउंडेशन या संघटनेसोबत संबंध असल्याचा एकही पुरावा पुढे आलेला नाही. याचबरोबर पोएटिक जस्टिस फाउंडेशन या संघटनेवर भारतात बंदी नाही. याप्रकरणात दिशा जरी कोणाला भेटली असेल तर तिला फुटीरतावादी ठरविता येत नाही, असेही तिच्या वकिलांनी स्पष्ट केले.  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख