मंदिरासाठी दरोडेखोरांकडून देणगी मागितली तर मीही दरोड्यात सहभागी का? न्यायाधीशांची विचारणा

शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट'मुळे चर्चेत आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली.
delhi session court hears activist disha ravi bail application in toolkit case
delhi session court hears activist disha ravi bail application in toolkit case

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट'मुळे चर्चेत आलेली पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिच्या जामीन याचिकेवरील निर्णय दिल्लीतील न्यायालयाने राखून ठेवला. न्यायालय याबाबत मंगळवारी (ता.२3) आदेश सुनावणार आहे. या सुनावणीवेळी न्यायालयाने अनेक प्रश्न उपस्थित करुन सरकारला विचारणा केली. 

शेतकऱ्यांशी संबंधित 'टूलकिट'मुळे प्रजासत्ताक दिनी हिंसाचार झाला, हे दर्शविणारे कोणतेही पुरावे समोर आले नसल्याचा दावा दिशाच्या वकिलांनी सुनावणीवेळी केला. दिल्लीत हिंसाचार झाला त्यावेळी आंदोलक 'टूलकिट'ची कॉपी खिशात ठेवून आले होते का? हिंसाचारासाठी 'टूलकिट' जबाबदार असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही, असे दिशाच्या वकिलांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या आंदोलनास आंतरराष्ट्रीय पातळीवर अधोरेखित करणे हा देशद्रोह असेल तर मी तुरुंगामध्येच चांगली आहे, असेही दिशाने सुनावणीदरम्यान सांगितले. 

दिशाच्या जामिनावरील सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी पोलिसांना धारेवर धरत काही प्रश्न विचारले. ते म्हणाले की, मी मंदिरासाठी दरोडेखोराकडे देणगी मागितली तर माझाही दरोड्यात सहभाग मानला जाईल का? 'टूलकिट' म्हणजे नेमकं आहे तरी काय? त्यामुळेच 26 जानेवारीला हिंसाचार झाला याचे पुरावे तुमच्याकडे आहेत का? समजा मी एका आंदोलनाशी जोडला गेलो आहे आणि याच उद्देशाने इतरांना भेटत असेल तर मलाही तुम्ही त्यांच्यातील समजाल काय? 

दिल्ली पोलिसांनी सुनावणीदरम्यान दिशाच्या जामीन याचिकेला विरोध केला. खलिस्तानचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींसोबत मिळून दिशाने टूलकिट तयार केले. भारताची प्रतिमा मलिन करणाऱ्या कारस्थानाचाच तो एक मोठा भाग आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून देशात अस्थिरता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले. 

दिशाला तिच्यावर होणाऱ्या कारवाईची आधीच माहिती होती. यामुळे तिने व्हॉट्सॲप ग्रुप, ई-मेल आणि अन्य पुरावे नष्ट केले, असा आरोप पोलिसांनी केला. दिशाच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले. दिशाचे पोएटिक जस्टीस फाउंडेशन या संघटनेसोबत संबंध असल्याचा एकही पुरावा पुढे आलेला नाही. याचबरोबर पोएटिक जस्टिस फाउंडेशन या संघटनेवर भारतात बंदी नाही. याप्रकरणात दिशा जरी कोणाला भेटली असेल तर तिला फुटीरतावादी ठरविता येत नाही, असेही तिच्या वकिलांनी स्पष्ट केले.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com