काय सांगता? आमदार महेश लांडगेंचे गुजराती भाषेतील फ्लेक्स गायब!

काय सांगता? आमदार महेश लांडगेंचे गुजराती भाषेतील फ्लेक्स गायब!

पिंपरी : मतांच्या लालसेपोटी भोसरीच्या आमदारांना गुजराती भाषेचा पुळका आला आहे. म्हणून त्यांनी गुजराती भाषेतील फ्लेक्स लावले आहेत, असा हल्लाबोल भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांचे कट्टर विरोधक व राष्ट्रवादीकडून इच्छूक असलेले ज्येष्ठ नगरसेवक दत्ताकाका साने यांनी केला.

दरम्यान, वादग्रस्त ठरलेले व सोशल मिडियात ट्रोल झालेले शहरातील गुजराती भाषेचे फलक अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे या फ्लेक्सजवळ आंदोलन करण्याचा मनसेचा प्लॅन फसला आहे.

पैलवानांचे गाव असलेल्या भोसरीला राजकीय संघर्ष नवा नाही. गेली पाच वर्षे तेथे शिवसेनेचे माजी खासदार व शिरूरचे संपर्कप्रमुख असलेले उपनेते शिवाजीराव आढळराव-पाटील व महेशदादांतून विस्तव जात नव्हता. लोकसभेच्या तोंडावर आढळरावांनी पुढाकार घेत त्याला तिलांजली दिली. त्यामुळे दोन दादांतील संघर्ष निमाला.

मात्र, एक पात्र बदलले असून तेथे दुसऱ्याचा प्रवेश झाला आहे. पाच वर्षापूर्वी महेशदादांचे जीवलग असलेले दत्ताकाका आता त्यांचे कट्टर विरोधक झाले आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेल्या महेशदादांनी २०१४ ला भोसरीत बंडखोरी केली. अपक्ष म्हणून ते उभे राहिले. काकांनी हातभार लावल्याने ते आमदार झाले.मात्र,आता दादांवर टीका करण्याची एकही संधी काका सोडत नाहीत. या विधानसभेला महेशदादांना पराभूत करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे. महेशदादांना पराभूत केल्याशिवाय शेंडी कापणार नाही, अशी जाहीर प्रतिज्ञा त्यांनी केलेली आहे. परिणामी भोसरीत दादा,दादानंतर आता दादा,काका लढाई सुरु झाली आहे.

केलेला पाठपुरावा व त्यातून केलेली काही कामे याबाबत महेशदादांनी नुकतेच मतदारसंघात गुजरातीसह २३ भाषेत फलक लावले होते. त्यावर भोसरीचे प्रश्न जैसे थे असून फसव्या जाहिरातीच्या फ्लेक्सव्दारे  जनतेला ‘नो उल्लू बनाविंग’ असा हल्लाबोल काकांनी  केला आहे. आम्हाला मराठीचा अभिमान सांगणाऱ्या आमदारांचे गुजरातीवर प्रेम आहे, असे ते म्हणाले.

``भोसकरीत गेल्या पाच वर्षात नुसती आश्वासनं अन् पाठपुरावाच सुरु आहे. ‘भय अन् भ्रष्टाचाराने’ भोसरीतील जनता त्रस्त आहे. स्वत:चे घर भरण्यापलिकडे कोणताच बदल घडलेला नाही. नगरसेवक व पालिकेच्या कामांचे श्रेय आमदार लाटत आहेत. आता ‘पॉलिटिक्स वुईथ रिस्पेक्ट’ म्हणणाऱ्या आमदारांचा रिसपेक्ट २०१४ ला कुठे होता त्यावेळी त्यांनी भोसरीच्या तत्कालीन आमदारांना आरे,तुरेची भाषा वापरली होती, असे काका म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com