Only Rahul Patil is rich other MLAs are fraudsters | Sarkarnama

परभणीत आमदार पाटील घरचे श्रीमंत,इतर सर्व लोकप्रतिनिधी घोटाळेबाज : रामप्रसाद बोर्डीकर 

गणेश पांडे
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

बोर्डीकरांच्या या आरोपांतून त्यांनी परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील यांचे नाव मात्र वगळले. राहूल पाटील स्वताचे पैसे देवून ही कामे करतात, त्यांना घोटाळा करण्याची गरजच काय ? अशी पुष्टीही जोडली.

परभणी :" परभणीच्या महावितरण कार्यालयामध्ये मोठ- मोठे घोटाळे आहेत. अधिकाऱ्यांच्या या घोटाळ्यात जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधीचे हात ओले आहेत," असा सनसनाटी आरोप जिंतूरचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी बुधवारी परभणीत केला. 

बोर्डीकरावरची परभणी शहर बंदी उठविण्यात आली आहे. त्यानंतर ते प्रथमच परभणीत आले होते. घोटाळेबाज लोकप्रतिनिधीच्या आरोपातून परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील यांना मात्र बोर्डीकरांनी क्लिनचिट दिली. बोर्डीकर सारख्या बड्या नेत्याकडून आमदार राहूल पाटलाची स्तूती ही आगामी राजकारणातील बदल दर्शवित असल्याचे बोलले जात आहे.

बुधवारी (31) परभणीत येताच बोर्डीकरांनी थेट महावितरणच्या कार्यालयावर धडक मारली. 

तेथे रोहित्राच्या विषयावर अधिकाऱ्यांना धारेवर धरत महावितरणमध्ये होणाऱ्या अनेक घोटाळ्यात परभणीच्या लोकप्रतिनिधीचे हात ओले झाले असल्याचा  आरोप केला. मात्र बोर्डीकरांनी या आरोपांतून परभणीचे आमदार डॉ.राहूल पाटील यांना वगळले. आमदार पाटील स्वतःच  श्रीमंत आहेत, त्यांना घोटाळ्याची गरजच काय ?  अशी पुष्टीही जोडण्यास बोर्डीकर विसरले नाहीत.

पाच दिवसापूर्वी त्यांना परभणी शहरात जाण्याची   परवानगी  न्यायालयाकडून मिळाली आहे. त्यामुळे बोर्डीकरांना परभणी येता आले. जिंतूर - सेलू विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या रोहित्राचा प्रश्न घेवून ते बुधवारी परभणी महावितरण कार्यालयात आले होते. त्या ठिकाणी बोर्डीकरांनी रोहित्राच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. या ठिकाणी देखील जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील विजेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रीत करावे असे ही सांगण्यास बोर्डीकर विसरले नाहीत. 

जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले," परभणी जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. या परिस्थितीमध्ये पिकांना जीवदान देण्यासाठी शेतकरी जिवाचे रान  करत आहे. परंतू महावितरणच्या अधिकाऱ्यांनी परभणी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आलेले रोहित्र नांदेडला पाठविले. यावर जिल्हयातील कोणताची लोकप्रतिनिधी बोलत नाही हे आमचे दुर्देव आहे. "

" महावितरणच्या घोटाळ्यात अधिकाऱ्याशी जिल्हयातील लोकप्रतिनिधीचे साटेलोटे जुळलेले आहे. त्यांचेही हात या घोटाळ्यात ओले झाले आहेत ,"असा  आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

http://www.sarkarnama.in/court-grants-permission-ramprasad-bordikar-enter-parbhani-city-30221

संबंधित लेख