BJP Youth Leader Maharashtra Jaykumar Rawal in Sarkarnama Diwali Aaak Interview | Sarkarnama

अमित शहा भाजपचे 'वाॅर मशिन' : जयकुमार रावल 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

राजकारणाचा वारसा आणि तळागाळात वर्षानुवर्षं केलेलं काम यामुळे उत्तर महाराष्ट्रातील मातब्बर चेहरा म्हणून #युवानेतृत्व जयकुमार रावल यांचे नाव घेतले जाते...रावल यांंनी सरकारनामा फेसबूकच्या माध्यमातून खानदेशातील भाजपची स्थिती, लोकसभा निवडणुक अशा विविध राजकीय मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली

जळगाव : ''आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर देशात व राज्यातही भाजपच्या विरोधात सर्व पक्ष एकत्र येत आहेत. परंतू, त्यामुळे विशेष फरक पडत नाही. विकासाच्या विषयावर न बोलता केवळ सत्तेसाठी विरोधक एकत्र येत असतील तर तेच आमच्या सरकारचे व भाजपचे यश म्हणावे लागेल. त्यामुळे सत्तेसाठी देशाची सुरक्षा, विकास आणि जनहिताशी तडजोड करणाऱ्या विरोधकांना जनता धडा शिकवेल व पुन्हा एकदा केंद्रात मोदींच्या कणखर नेतृत्वात पूर्ण बहुमताने भाजपचे सरकार स्थापित होईल," असा विश्‍वास राज्याचे पर्यटन विकास व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा हे 'वाॅर मशिन' असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.

'सरकारनामा'च्या फेसबुक पेजवरील लाइव्ह मुलाखतीदरम्यान त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या तयारीचे नियोजन तसेच राज्यातील पक्ष संघटनाबाबत बातचीत केली.  

'सकाळ' खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी रावल यांच्याशी साधलेला संवाद असा - 

- धुळे जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असताना भाजपला यश कसे मिळाले, काय नियोजन केले? 
रावल : खानदेशात गेल्या 70 वर्षांत अपेक्षित विकास झाला नाही. मात्र, गेल्या काही वर्षांत आम्ही विकासाचा एक नवा पॅटर्न उभा केला. मुख्यमंत्री त्यासंदर्भात आमचे दिशादर्शक आहे. दोंडाईचा पालिकेची देशात आदर्श ठरेल, अशी इमारत उभारली. धुळे जिल्ह्याचाही अपेक्षित विकास झाला नाही. व्यक्तिकेंद्रीत व्यवस्था आम्ही मोडीत काढली. देश प्रथम, पक्ष नंतर आणि स्वत:ला शेवटचे स्थान ठेवत आम्ही विकासाच्या कामाला लागलो. जनता, लोक आमच्यासोबत आले. त्यांनी विश्‍वास दर्शविला. भाजप हा जनतेचा पक्ष आहे. सत्ता हे सेवेचे साधन आहे, जनतेला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. धुळे महापालिकेतही भाजपला यश मिळेल, गिरीश महाजनांच्या नेतृत्वात महापौर भाजपचाच होईल, असा विश्‍वास आहे. 

- भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्रित येत आहेत, तो चक्रव्यूह कसा भेदणार? 
रावल : सर्व विरोधक एकत्र येत आहेत, त्यातच आमचे यश आहे. सर्व विरोधक सत्तेसाठी एक होताहेत. तत्कालीन सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा हाहाकार माजला. गुरांच्या छावण्या, कॉमनवेल्थ अशा सर्वच गैरव्यवहारांच्या प्रकरणांनी देश लुटला. जनतेने हे उघड्या डोळ्यांनी पाहिले. म्हणूनच जनतेने केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार स्थापन केले. विकास केला म्हणूनच जनता आमच्यासोबत आहे. आगामी काळातही केंद्रात तर मोदींच्या नेतृत्वात सरकार येणारच. मुख्यमंत्र्यांना विविध विषयांचा अभ्यास आहे, ते आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पूर्ण बहुमत मिळणार. 

आगामी लोकसभा निवडणुकीकडे कसे बघता? 
- रावल :
पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे 'वॉर मशिन' असून चोवीस तास काम करताहेत. वर्षभरापूर्वीच तयारी सुरु झाली असून सूक्ष्म नियोजन झाले आहे. पूर्वतयारी करुन रणनीती तयार आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आम्ही तीनशेवर जागा मिळवू. गेल्यावेळी राज्यसभेत बहुमत नव्हते, म्हणून काही अडचणी आल्या. आता सर्वांत मोठा पक्ष आमचा आहे. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेतही बहुमत मिळवून देशाच्या प्रगतीसाठी मोदींच्या नेतृत्वात आम्ही झटत आहोत. मोदींसारखे कणखर नेतृत्व लाभले असून खानदेशातील सर्व जागा आम्ही निश्‍चितपणे जिंकणार. 

निवडणुकीचे नियोजन करताना आमच्यासाठी 'बूथ'रचना महत्त्वाची मानली गेली आहे. त्यामुळे हे "बूथ' मजबूत करण्याचे आमचे नियोजन झाले आहे. खानदेशात, राज्यातच नव्हे तर देशभरात हे काम अपडेट झाले असून त्या माध्यमातून आमचे संघटन आधीपेक्षा चांगले मजबूत झाले आहे. विशेष म्हणजे पक्षाध्यक्ष अमित शाह या सर्व रचनेकडे व्यक्तिगतपणे लक्ष ठेवून आहेत, ते आढावाही घेत आहेत. निवडणुकीपर्यंत हे काम सुरु राहील, त्यामुळे येत्या निवडणुकीत गेल्यावेळेपेक्षा 40-50 खासदार अधिक निवडून येतील व मोदींचेच सरकार प्रस्थापित होईल. 

- मंत्रिमंडळ विस्तारात अतिरिक्त खाते मिळेल का? 
रावल
: या परिसरातील जनतेशी आमची तीन पिढ्यांची बांधिलकी. सर्व लोकांकडे आम्ही जातो, त्यांच्यात जातो व राहतो. निवडणूक आली की सर्व मतदारसंघ, परिसरच आमचे घर असते. रात्री-अपरात्री घरी परतण्यापेक्षा आम्ही पाड्यावर, खेड्यांमध्ये आमच्या कार्यकर्त्याच्या घरी राहतो. हे सर्व काम मुख्यमंत्र्यांनी पाहिले आहे. त्यांनी विश्‍वास दर्शविला व तो मी सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करतो. मंत्रिपदासाठी काम करत नाही. त्यामुळे अतिरिक्त खाते मिळेल की नाही, त्याचा विचार नाही. नेतृत्वाने जबाबदारी सोपवली तर ती प्रामाणिकपणे पार पाडू. 

#नातंशब्दांशी #दिवाळीअंक #प्रभावीनेते #युवानेतृत्व #सरकारनामा #SarkarnamaDiwali

जयकुमार रावल यांच्या मुलाखतीचे अाधीचे भाग - 

पर्यटनाला रोजगाराची जोड देत विकास : जयकुमार रावल

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प : जयकुमार रावल

सरकारनामाचा दिवाळी अंक अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात घरपोच उपलब्ध - क्लिक करा आणि आजच मागवा

संबंधित लेख