काय सांगता? पुणे झेडपीच्या या शाळेत प्रवेशासाठी पाच हजार विद्यार्थी वेटिंगवर!

या शाळेतील मुलांना साहित्यविषयक गोडी लागावी, म्हणून वाचनालयात बालसाहित्याची पुस्तके उपलब्ध केली आहेत. यातून मुलांचा शब्दसंग्रह प्रचंड वाढला. साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी मुलांना काव्य निर्मितीसाठी प्रेरणा दिली यातूनच मुले कविता करू लागली. लवकरच मुलांचा परीसस्पर्श हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे.
wablewadi school
wablewadi school

कोरेगाव भीमा (ता. शिरूर, पुणे) : राज्यातील पहिली टॅबलेट शाळा, जगातली तिसरी आणि भारतातील पहिली ओझोन व 'झिरो एनर्जी स्कूल' यासह विविध वैशिष्ट्यामुळे आंतराष्ट्रीय पातळीवर नावारुपाला आलेल्या पुणे जिल्ह्यातील ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडी’ या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी प्रवेश प्रतिक्षा यादीचाही उच्चांक झाला आहे. केवळ ३२ पटसंख्येवरुन सध्या सहाशे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दर्जेदार शिक्षण मराठी माध्यमातून देणाऱ्या या शाळेत प्रवेशाची प्रतिक्षा यादी पाच हजारावर गेल्याने आता नवी नोंद घेणेही शाळेला थांबवावे लागले आहे. 

सध्याच्या स्पर्धेच्या काळात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी किमान पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांना दारोदार जावे लागत असताना वाबळेवाडी शाळेच्या यशाची ही किमया साधणारे शिक्षक दत्तात्रय वारे सर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य शिक्षणक्षेत्रात किती चांगले काम करणे शक्य आहे, हे दाखवण्यासाठी डोळ्यात झणझणीत अंजण घालणारे ‘रोल मॉडेल’च ठरलेय. 

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात शिक्रापूरची पासून अडीच किलोमीटरवर साधारण ६५ घरांची व सुमारे साडेतीनशे लोकसंख्येची ही छोटीशी वाबळेवाडी आज येथील शाळेमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. सुरुवातीला फक्त दोन गळक्या खोल्या व पडक्या भिंतींच्या या दोन शिक्षकी जिल्हा परिषद शाळेत २०१२ मध्ये दत्तात्रय वारे गुरुजी बदली होवून आले. एरव्ही शाळेची ही अवस्था पाहून एखाद्या शिक्षकानं ही बदलीच न स्वीकारता दुसऱ्या एखाद्या चांगल्या शाळेसाठी प्रयत्न केले असते. मात्र वारे गुरूजींनी येथे शैक्षणिक परिवर्तन घडवण्याचा निर्धार करुन विद्यार्थांना शिकवण्यास सुरवात केली.

दोन शिक्षकी शाळेत दोनच छोट्या खोल्यात एकत्र बसणारी सर्व इयत्तेची मुले, हे चित्र बदलण्यासाठी वारे गुरूजींनी १५ ऑगस्ट २०१२ मध्ये ग्रामसभेत शाळेच्या सर्वांगिण परीवर्तनासाठी सर्वांच्या सहभागातून काय करता येईल, हे सांगणारा आराखडा मांडला. खरं तर दोन पडक्या खोल्यामधून दर्जेदार शाळा निर्माण करणं, ही खरं तर हास्यास्पद गोष्ट मात्र दत्तात्रय वारे यांनी ती गावच्या लोकांना विश्वासात घेवून सांगितली. वारे गुरूजी म्हणतायत म्हणजे नक्कीच चांगले होणार, या विश्वासाने वाडीतील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून शाळेसाठी काम करण्यांचा निर्धार केला. गावातील १९ महिला बचत गटांनी पुढची तीन वर्ष होणारा नफा शाळेला देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. ग्रामस्थ व शाळेने चांगल्या विचाराने एकत्र काम केल्यास काय घडु शकते, हे चित्र पुढे दिसले. बचत गटांसोबत गावातल्या तरुणांनीही नवरात्र व गणेशोत्सवांसारख्या सणांचा खर्च कमी करून तो पैसा शाळेसाठी दिला. शाळेतील शिक्षकांवर ग्रामस्थांनी दाखवलेला विश्वास शिक्षकांनीही सार्थ करून दाखवला. दर्जेदार शिक्षण व नाविन्यपुर्ण उपक्रमामुळे शाळेची विद्यार्थी संख्या वाढू लागली. 

ग्रामस्थांचाही उत्साह आणखी वाढला. त्यानंतरच्या वर्षी यात्रेनिमित्त तमाशासाठी जमलेले सुमारे सव्वा लाख रुपये यात्रा कमिटीने खऱ्या अर्थाने सत्कारणी लावण्यांसाठी वारे गुरुजींकडे सुपूर्द केले. त्या रकमेतून वारे गुरुजींनी विद्यार्थांसाठी टॅब घेतले. अन्‌ वाबळेवाडी हे 'महाराष्ट्रातील पहिले टॅब स्कूल' ठरले. वाढत्या विद्यार्थी संख्येसाठी नवीन खोल्या बांधण्यासाठी वारे गुरुजींनी ग्रामस्थांपुढे प्रस्ताव मांडला. त्यांस प्रतिसाद देत ग्रामस्थांनी सुमारे अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची दिड एकर जमीन बक्षीसपत्र करून शाळेच्या नावावर केली. अन शाळेत सर्वांगिण परिवर्तन घडु लागले. वारे गुरुजी व खैरे गुरुजी या दोन्ही शिक्षकांनी अभिनव संकल्पना व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत शाळेची पटसंख्याही दोनशेवर नेली. दहा दहा विद्यार्थांचे गट तयार करुन त्यांना वरच्या वर्गातील एक विद्यार्थी विषय मित्र म्हणून देण्याचा उपक्रमही प्रभावी ठरला. छोट्या प्रयोगातुन विज्ञानाच्या संकल्पना विद्यार्थांमध्ये रुजवण्यात आल्या. 

शाळेचा नावलौकीक ऐकून एक दिवस 'बॅंक ऑफ न्यूयार्कचे' काही अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी आले. त्यांनी शाळेला मदतीचा प्रस्ताव ठेवला. त्यावर नेमके काय हवे, असे विचारल्यानंतर वारे गुरुजींनी नव्या शाळेचे डिझाईन त्यांच्यासमोर ठेवले. ते त्यांना पसंत पडल्याने आंतराष्ट्रीय दर्जाला जुळणाऱ्या आठ वर्गखोल्यासह 'झिरो एनर्जी स्कूल'ची निर्मीती करण्यात आली. जगभरात जपान आणि आयर्लेंड नंतर वाबळेवाडी ही जगातली ही तिसरी 'झिरो एनर्जी स्कुल' शाळा ठरली. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातूनही शाळेच्या कामास दिड कोटींचे अर्थसाह्य लाभले. शाळेचा प्रश्न मिटल्यानंतर वारे गुरुजींनी पुन्हा विद्यार्थ्याकडे लक्ष केंद्रीत केले. अनुभवातून शिक्षण देण्यासाठी मुलांना पोहणे, संगीत, नाटक अशा प्रत्येक गोष्टीत विद्यार्थांची रुची वाढवण्यात आली. मुलांनी श्रमसंस्कारांचे महत्व पटवण्यांसाठी पंचक्रोशीत सुमारे एक लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. शाळेची यशस्वी वाटचाल व वाढती विद्यार्थी संख्या पाहून राज्य सरकारनेही शाळेला दर्जेदार शिक्षणासाठी १० शिक्षकांची नियुक्ती केली. सध्या शाळेत बारा शिक्षक कार्यरत आहेत. 

उल्लेखनीय अशा ‘ओजस’ शाळेच्या उपक्रमातून शाळेत आठवी ते १२ वी पर्यंत टप्प्याटप्प्याने शिक्षणाची सोय निर्माण करण्यात आली असून सध्या नववी पर्यन्तचे वर्ग सुरु आहेत. स्थानिकांच्या पाठबळासह नावीन्यपूर्ण शिक्षणपद्धती, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भौतिक सुविधा तसेच क्रीडा, कला, साहित्य आणि जागतिक दर्जाचे माहिती तंत्रज्ञान यासह विद्यार्थ्यांचा चतुरस्र विकास अशा स्वरूपाची शिक्षणपद्धती ओजस उपक्रमात राबविली जाते. तर नजिकच्या काळात बारावीपर्यंत शिक्षण देणारी राज्यातील पहिली जिल्हा परिषदेची शाळा ठरण्याचा मानही वाबळेवाडीच्या शाळेलाच मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीच्या व दर्जेदार मराठी माध्यमाच्या शिक्षणामुळे सध्या शाळेची विद्यार्थीसंख्या सुमारे सहाशेच्या वर गेली आहे. वाबळेवाडी सारख्या ग्रामीण भागात टॅबलेटसह आधुनिक साधने हाताळत अभ्यास करणारे विद्यार्थी १९ अंकी रक्कम वाचू शकतात, तर नुकत्याच वाबळेवाडी शाळेतील एका विद्यार्थ्याने ‘वायफाय’ पेक्षाही सुरक्षित असे ‘लायफाय’ तंत्रज्ञानाचे सादरीकरण करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यासह अनेक वैशिष्ट्यांमुळे ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडी’ या शाळेने शैक्षणिक दर्जाबाबत इंग्रजी माध्यमांच्या शाळांपुढेही आव्हान निर्माण केले आहे.

मात्र त्यासाठी राष्ट्रपती पारितोषीक विजेते शिक्षक दत्तात्रय वारेंसह सर्व शिक्षक व त्यांना साथ देणारे वाबळेवाडी ग्रामस्थांचे योगदान नक्कीच कौतुकास्पद आहे. मातृभाषेत ज्ञानग्रहण परिपूर्ण होते, असे जागतिक सर्वेक्षण असल्याने ‘इंटरनॅशनल स्कूल’ अशी मान्यता मिळालेल्या वाबळेवाडी शाळेत मराठी माध्यमातूनच जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. सर्वदूर नावाजलेल्या शाळेच्या ख्यातीमुळे गतवर्षीपासून विद्यार्थी प्रतिक्षा यादीही सुमारे पाच हजारावर गेली असून दरवर्षी ही संख्या वाढतच असल्याने क्षमतेअभावी आता शाळेला प्रतिक्षा यादीचीही नोंदणीही थांबवावी लागली असल्याचे दत्तात्रय वारे व शिक्षक सचिन बेंडभर यांनी सांगितले.

शाळेच्या या यशाचे रहस्य उलगडताना दत्तात्रय वारे सांगतात की, शिक्षणाविषयी गावात काम करताना प्रेरणा असलेले शिक्षक, साथ देणारे ग्रामस्थ तसेच सुसज्ज यंत्रसामग्री ही त्रिसुत्री असल्यास गावागावातील शाळाही दर्जेदार बनतील. तसेच पर्यावरण बचावासाठी आंदोलन करणाऱ्या स्विडनच्या ग्रेटा थनबर्नला भेटून वाबळेवाडीच्या विद्यार्थ्यांनाही पर्यावरण संवर्धनाचा विचार प्राधान्यक्रमाने करायला शिकवण्याचा निर्धारही दत्तात्रय वारे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com