ZP president, vice president election | Sarkarnama

सुरेश धस यांचे बीडमध्ये  धनंजय मुंडेंना धोबीपछाड 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मार्च 2017

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यभरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी राज्यभरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याचा पहिला दणका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना बीडमध्ये स्वपक्षातूनच बसला. झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादीचे 60 पैकी सर्वाधिक 26 सदस्य निवडून आले. राष्ट्रवादी सत्ता स्थापण्याच्या तयारीत होती. मात्र माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करूनही सत्ता स्थापनेसाठी त्यांची मदत घेण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला. त्यामुळे पक्षाचे जिल्हाध्यक्ष व जयदत्त यांचे बंधू भारतभूषण यांनी पदाचा राजीनामा दिला. दुसरीकडे बीडमधील राष्ट्रवादीच्या चांगल्या कामगिरीचे यश हे एकट्या धनंजय मुंडे यांना मिळत असल्याचे माजी आमदार सुरेश धस चिडले होते. त्यांनी आपल्या पाच समर्थक सदस्यांना भाजपला मतदान करण्याचा आदेश दिला. धस यांनी ही खेळी खेळताच भाजपकडे पाठिंब्यासाठी रांग लागली. या साऱ्या वादात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची अनपेक्षितपणे बीड जिल्हा परिषदेवर सत्ता येणार आहे. हेच धस बारा वर्षांपूर्वी भाजपचे आमदार असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे यांची जिल्हा परिषदेतील सत्ता घालवली होती. धस यांनी तोच धडा आता धनंजय यांना शिकवला आहे. 

कोल्हापुरातील ट्‌वेंटी-20त 
मुख्यमंत्र्यांची खेळी 

कोल्हापूर झेडपीतील सामना मोठा चुरशीचा बनला आहे. भाजपकडून आमदार अमल महाडीक यांच्या पत्नी शौमिका आणि कॉंग्रेसकडून जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचा मुलगा राहुल या दोघांत अध्यक्षपदासाठी लढत होणार आहे. शौमिका यांचे सासरे महादेवराव महाडीक आणि पी. एन. पाटील या दोघांत गेली अनेक वर्षे घट्ट मैत्री आहे. या दोघांनीही मिळून माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची "गोकूळ'वरील सत्ता घालवली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य वजनदार मंत्र्यांकडून सदस्यांना थेट फोन करून पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पद, पैशाबरोबरच विकासकामांसाठी निधी देण्याचे आश्‍वासन दिले जात असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अमल महाडीक यांनी आज दिवसभर हालचाली गतिमान केल्या. शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांना वगळता बहुतांश सेना नेते भाजपला सहकार्य करण्याच्या भूमिकेत आहेत. कोल्हापुरात भाजपचा पहिल्यांदाच अध्यक्ष झाला तर तो इतिहास ठरेल. दुसरीकडे पी. एन. पाटील आणि महाडीक यांच्यात भांडणे लागल्याने सतेज पाटील खूष आहेत. 

सेना व भाजपमध्ये 
औरंगाबादेत रस्सीखेच 

औरंगाबाद झेडपीचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी शिवसेनेचे पैठण तालुक्‍यातील सदस्य आक्रमक झाले आहेत. "शिवसेनेचे सर्वाधिक सात सदस्य येथूनच असल्याने झेडपी अध्यक्षपद पैठणलाच मिळावे; डावलल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल' असा इशारा या सदस्यांनी दिला आहे. दुसरीकडे भाजपने तुम्ही आमच्याकडे आलात तर अध्यक्षपद देतो, असा शब्द या सदस्यांना दिला आहे. येथे भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेसशी हातमिळवणी केली असताना शिवसेनेतच फूट पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या मागणीमागे शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे यांचेच डोके असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी फारसे पटत नसलेल्या भुमरे यांनी हा डाव टाकल्याचे बोलले जाते. 

साताऱ्यात बारामतीच्या खलित्याची प्रतीक्षा 
सातारा झेडपी अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने संजीवराजे निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे, वसंतराव मानकुमरे यांची तर उपाध्यक्षपदासाठी राजेश पवार, सुरेंद्र गुदगे यांची नावे निश्‍चित केली. या नावांवर आज रात्री पुन्हा राष्ट्रवादीचे सर्व आमदार हे विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासोबत एकत्रित बसून चर्चा करून दोघांची नावे बारामतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळविली जातील. सकाळी दहा वाजता यापैकी कोणाचे नाव निश्‍चित करायचे याचा खलिता बारामतीहून येईल. रामराजेंचे बंधू संजीवराजे यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. 

कॉंग्रेसची विदर्भात भाजपशी 
तर कुठे शिवसेनेशी आघाडी 

अमरावती जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे फासे 
टाकले आहेत. या आघाडीमध्ये सेनेच्या वाट्याला उपाध्यक्षपद जाणार आहे. यवतमाळमध्ये शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी भाजपने कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचा डाव टाकला आहे. त्यामुळे कॉंग्रेस-भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी आघाडी यवतमाळमध्ये आकाराला येऊ शकते. यात कॉंग्रेसला अध्यक्षपद भाजपला उपाध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसला तीन सभापतिपदाची लॉटरी लागण्याची शक्‍यता आहे. येथे राज्यमंत्री संजय राठोड यांना धडा शिकविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गडचिरोलीमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष असला तरी राज्यमंत्री अंम्ब्रिश राजे आत्राम यांचे कॉंग्रेसचे बंडखोर दीपक आत्राम यांचे पटत नसल्याने दीपक आत्राम यांनी कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. कॉंग्रेस-दीपक अत्राम गट व अपक्ष अशी सत्ता आकार घेऊ शकते. विदर्भातील चंद्रपूर व वर्धा येथील जिल्हा परिषदांत भाजपला पूर्ण बहुमत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख