महिला zp सदस्याने पकडला बोगस डाॅक्टर

महिला zp सदस्याने पकडला बोगस डाॅक्टर

शिक्रापूर : पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुम आबाराजे मांढरे यांच्या जागरुकतेमुळे शिक्रापूर (ता. शिरूर) येथे बोगस डॉक्‍टर असल्याचे उघड झाले. पुणे जिल्ह्यात बोगस डॉक्टर नसल्याचा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा दावा यामुळे फोल ठरला आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी रुग्णांवर उपचार करणाऱ्या कामगारास अटक केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिक्रापुरात (ता. शिरूरर) येथे काही युवती रेश्माबाई नेमीचंद जैन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या नावाने लहान मुलांची माहिती संकलित करत होत्या. ही माहिती रीना क्लिनिक मध्ये देण्यात येत होती. चौकशीच्या निमित्ताने या युवतींनी मंगळवारी (ता. 9) मांढरे यांचे निवासस्थान गाठले. घरातील मुलांची माहिती त्या घेवू लागल्या. या युवतींबाबत शंका आल्याने मांढरे यांनी याबाबत पती आबाराजे मांढरे यांना माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागकडे तक्रार केली.

तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण शिंदे, आरोग्य सहाय्यक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक संतोष चोपडा यांनी रिना क्‍लिनिक मधील डॉक्‍टरांची चौकशी केली असता तिथे कुणी डॉक्‍टरच नसल्याचे उघड झाले. शिक्रापूर पोलिसांकडे याबाबत तक्रार करण्यात आली. पोलीस हवालदार शशिकांत बंड व बाळासाहेब थिकोळे यांनी तपासणी केली असता सदर डॉक्टरचे कोणतेही व्यवसाय प्रमाणपत्र आढळून आले नाही. या शिवाय दवाखान्यात विविध प्रकारची औषधे, इंजेक्‍शन्स, गोळ्या, मुदत संपलेली औषधे, वेगवेगळ्या पत्त्यांच्या हॉस्पिटलची कोरी कागदे आढळून आली. विशेष म्हणजे या दवाखान्यात उत्पल बिश्वास हा कामगार रुग्णांवर उपचार करीत असल्याचे उघडकीस आले.

दरम्यान, या दवाखान्यात डॉ. पी. कुमार या नावाने एकजण वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य अधिकारी व पोलिसांनी पंचनामा करून सर्व साहित्य ताब्यात घेतले. डॉ. शिंदे यांनी याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी उत्पल अरविंद बिश्वास (मूळ रा. दक्षिणपारा, ता. मधुपूर, जि. छाप्राबंगाली - नादिया, पश्‍चिम बंगाल, सध्या रा. शिक्रापूर) याला अटक केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com