zp ceo mandhare takes tough action agaisnst errant teachers | Sarkarnama

शिक्षक संघटनांच्या खोट्या पुढाऱ्यांना ZP CEO मांढरे यांचा दणका : दाखविला डोंगराळ भाग

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

पुणे : शिक्षक संघटनांचे पुढारी असल्याचे खोटे कागदपत्रे देऊन स्वतःची बदली रद्द करून घेणाऱ्या अकरा शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दणका दिला आहे. या अकरा जणांच्या दोन वर्षांच्या वेतनवाढी रद्द करण्यात आल्या असून त्यांची दुर्गम भागात बदली करण्यात आली आहे.

पुणे : शिक्षक संघटनांचे पुढारी असल्याचे खोटे कागदपत्रे देऊन स्वतःची बदली रद्द करून घेणाऱ्या अकरा शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दणका दिला आहे. या अकरा जणांच्या दोन वर्षांच्या वेतनवाढी रद्द करण्यात आल्या असून त्यांची दुर्गम भागात बदली करण्यात आली आहे.

सोयीच्या ठिकाणी असलेल्या शाळांवरील बदली टाळण्यासाठी शिक्षक मंडळींनी अनेक क्लुप्त्या लढविण्याची चर्चा नेहमी होत असते. मात्र त्यांच्यावर कारवाईचा प्रसंग क्वचितच येतो. मान्यताप्राप्त संघटनांचे पदाधिकारी असल्यास संबंधितांना त्यांच्या विद्यमान नियुक्तीच्या ठिकाणी आणखी पाच वर्षांचा म्हणजे एकूण पंधरा वर्षांचा कालावधी मिळू शकतो. इतर शिक्षकांसाठी हा कालावधी दहा वर्षांचा आहे. त्यामुळे शिक्षक पुढाऱ्यांची बदली करण्याचा प्रसंग पंधरा वर्षानंतर येतो.

राज्य सरकारने आॅनलाइन बदल्या सुरू केल्यानंतर या सवलतीचा फायदा घेण्यासाठी या ११ शिक्षकांनी खोटी कागदपत्रे सादर केली. कोणत्याही थातुरमातुर संघटनेचे लेटर हेड तयार करून त्याच्यावर आपली पदाधिकारी म्हणून नियुक्ती असल्याचे दाखविले. ही संघटना मान्यताप्राप्त आहे की नाही, हे तपासले गेले नव्हते. त्यामुळे या अकरा शिक्षकांच्या त्यांच्या सोयीच्या ठिकाणांहून बदल्या झाल्या नाहीत. कालांतराने या संघटना बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर या शिक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव गेले वर्षभर धूळ खात पडला होता. मांढरे यांच्या टेबलवर ही फाइल आल्यानंतर त्यांनी संबंधितांना थेट दुर्गम भाग दाखविला. तसेच त्यांच्या दोन वेतनवाढीही रद्द करण्याचा आदेश दिला.

याशिवाय काही शिक्षकांनी खोटी वैद्यकीय प्रमाणपत्रे देणे, घटस्फोटाचे किंवा विवाहाचे खोटे कागद दाखविणे असेही प्रकार केले आहेत. अशा २०० शिक्षकांची फाईल जिल्हा परिषदेत तयार आहे. या संबंधित शिक्षकांवरही लवकरच कारवाईची शक्यता आहे. मात्र थेट पुढारी समजल्या जाणाऱ्या शिक्षकांवरच कारवाई झाल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख