राज्यात नेते न लादण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला झारखंडमधील पराभवाने इशारा

राज्यात नेते न लादण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला झारखंडमधील पराभवाने इशारा

नवी दिल्ली : आदिवासीबहुल झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली राज्यघटनेवर विश्‍वास असणाऱ्या धर्मनिरपेक्ष आघाडीला मिळालेला प्रचंड विजय व मस्तीतील भाजपचा दारूण पराभव सत्तारूढ केंद्रीय वर्तुळात अगदीच अनपेक्षित नसला तरी झारखंडमध्ये संख्याबळाचे अंतर कमी असेल व "ऑपरेशन कमळ' राबविण्यासारखी स्थिती होईल ही पक्षनेतत्वाची आशा धुळीला मिळाली आहे. 

महाराष्ट्र - हरियाणाप्रमाणे राज्य पक्षसंघटनेत फारसा पाठिंबा नसलेले नेतृत्व दिल्लीतून लादण्याची " कॉंग्रेस स्टाईल ' भाजपमध्ये यापुढे चालणार नाही, लादलेल्या नेतृत्वाचा वाढत गेलेला अहंकार-उन्मत्तपणा जनाधार असलेले पक्षनेते सहन करणार नाहीत तसेच दिल्लीतील बहुमताच्या मस्तीमध्ये राज्यांचा व घटकपक्षांचाही विरोध होणारे कायदे रेटता येणार नाहीत, हा सांगावा या निकालांनी भाजपला दिला आहे. 

महाराष्ट्रासह पाच मोठ्या राज्यांतून हद्दपार झालेल्या भाजपशासित राज्यांची संख्या गेल्या अवघ्या वर्षभरात 21 वरून 15 वर घसरली आहे. विजयाच्या रूपाने आलेल्या सांताक्‍लॉजने भाजपला चीतपट करणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चासह विरोधकांना नाताळच्या पूर्वसंध्येला गोड भेट दिली आहे. मात्र "पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेच्याच भरवशावरच विजयपथाकडे वाटचाल' हा भाजप नेत्यांचा विश्‍वास कायम आहे. 

शिबू सोरेन यांचा वारसा चालविणारे हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चा-कॉंग्रेस आघाडीचा इतका निर्भेळ विजय होईल अशी अपेक्षा भाजपला नव्हती. रघुवर दास यांच्या रूपाने केंद्राने लादलेले नेतृत्व झारखंडमध्ये स्थानिक भाजप नेत्यांच्या नाराजीला कारणीभूत ठरले त्याचबरोबर मित्रपक्षांना गृहीत धरण्याचा अंहभाव भाजप नेतृत्वाने महाराष्ट्राप्रमाणेच कायम ठेवला. धर्मांध शक्तीना भाजपला सत्तेबाहेर घालविणाऱ्या विधानसभा निवडणूक निकालांनी केंद्रातील सत्तारूढ भाजपला पुढील वर्षीच्या दिल्ली व बिहार निवडणुकांबाबत सावधान हाही इशारा दिला आहे. 

काळा कायदा म्हणून देशभरात आक्रोश असलेल्या नागरिकत्व दुस्ती कायद्याबाबतही मोदी सरकारला हा निर्वाणीचा इशारा मानला जातो. अर्थात मोदी सरकारकडून हे इशारे लक्षात घेतले जाण्याची शक्‍यता अंधुक असल्याचेही जाणकार मानतात. अब की बार 65 पार ची भाजपची रणनीती बंडखोरी केलेल्या शरयू राय यांच्यासारख्या नेत्यांनी मातीत मिळविली. या राज्यात जाऊन आलेल्या पत्रकारांच्या मते दास यांची व्यक्तिगत प्रतिमा भाजपला हानीकारक ठरली व केंद्र-राज्याच्या काही निर्णयांमुळेही भाजपला पराभव चाखावा लागला. 

महाराष्ट्रातील मोदीनियुक्त नेतृत्वाप्रमाणेच दास यांचा अहंकार कमालीचा वाढला होता. झुंडीचा बळी ठरलेल्या तबरेज अन्सारी या निष्पाप तरूणाच्या हत्येबद्दल त्यांनी जी मुक्ताफळे उधळली त्यामुळे जनतेच्या नाराजीत अधिक भर पडली. राय यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याकडे वारंवार हा मुद्दा उपस्थित केला मात्र त्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत, अशा भावनेतून केंद्रीय नेतृत्वाने त्यांना दूर सारले व एक मोठा निष्ठावान गट भाजपपासून दूर झाला. राज्यात अल्पसंख्यांकांवरील सामूहिक हल्ल्यांत वाढ होऊनही दास यांचे सरकार अलिप्त राहिले व उलट धर्मांतरविरोधी कायदा आणून ख्रिश्‍चन समाजाची नाराजी त्यांनी ओढवून घेतली. 

राज्यात अल्पावधीत भूकबळींची संख्या 22 पर्यंत वाढली त्याकडेही दास सरकारने दुर्लक्ष केले.आदिवासींच्या जमिनी रक्षण करण्याची भाषा करणारा; प्रत्यक्षात त्या हडपण्याची छुपी तरतूद असलेला छोटा नागपूर कास्तकार वटहुकूम व संथाल परगणा कास्तकार वटहुकूम याविरूध्द उपाळलेला असंतोष दास यांनी दुर्लक्षित केला. या दोन्ही कायद्यांवर स्वाक्षरी करण्यास राष्ट्रपतींकडून नकार मिळाला. जमीन अधिग्रहण कायद्यावरूनही असाच असंतोष निर्माण झाला. एका बड्या उद्योगपतीच्या उर्जानिर्मिती कारखान्यासाठी गोड्डा येथे जमीनी बळकावण्यास विरोध करणाऱ्या लोकांवर गोळीबार केल्याचा आरोप झाला. 

भाजप नेते याला मोदींच्या नेतृत्वाचा व शहा यांच्या धोरणांचा पराभव झाल्याचे मानत नाहीत. मोदींवरच पक्षाची यापुढेही भिस्त राहणार असेही दिसते. भाजप नेते विजय सोनकर शास्त्री यांच्या मते भाजपची कामगिरी खालावण्यास पक्षातील बंडखोरच जबाबदार आहेत. मात्र भाजप हा शिस्तबध्द कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जगातील या सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाला एखाददुसऱ्या पराभवाने फारसा फरक पडत नाही. देशाची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागे ठाम उभी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. 

हेमंत सोरेन यांचे अभिनंदन : मोदी 
झारखंडच्या जनतेने दिलेला निकाल भाजप स्वीकारत आहे. निकाल काहीही लागले तरी आम्ही यापुढेही राज्याची सेवा करणे कायम ठेवू. राज्याला भाजपने गेल्या पाच वर्षांत विकासाभिमुख सरकार दिले. आता हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाला मिळालेल्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com