मुलींच्या विवाहाचं वय किती असावं..?

पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणातील महिला विवाहाच्या किमान वयाच्या मुद्द्यावरून महिलांच्या विवाहाचे किमान वय हे 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
3marrige.jpg
3marrige.jpg

नवी दिल्ली : स्वातंत्र्यपूर्व काळात बालविवाह थांबवण्यासाठी अगदी राजाराम मोहन रॉय यांच्या काळापासून महिलांचे विवाहाचे वय किती असावे, या मुद्द्याला तर्कशास्त्रीयदृष्ट्या वादविवादाची किनार आहे. या विवादात्मक मुद्द्याला तद्‌काळापासून आतापर्यंत धार्मिक आणि सामाजिक पुराणमतवादींकडून झालेल्या मोठ्या विरोधाला सामोरे जात पुरुष व स्त्रियांसाठी विवाहाचे किमान वय अनुक्रमे 21 वर्षे आणि 18 वर्षे ठरवण्यात आले आहे ; मात्र, आता पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणातील महिला विवाहाच्या किमान वयाच्या मुद्द्यावरून महिलांच्या विवाहाचे किमान वय हे 18 वर्षांवरून 21 वर्षे करण्याबाबत सरकारी पातळीवर हालचाली सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

 
पंतप्रधानांनी उल्लेख केलेल्या समितीबाबत...
2 जून रोजी केंद्र सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने मातृत्वाच्या वयाशी संबंधित बाबी तपासणे, मातृत्व मृत्युदर कमी करण्यासाठी काय करता येईल आणि महिलांमधील पौष्टिक पातळीत होणाऱ्या सुधारणेच्या अभ्यासासाठी एका कृती दलाची स्थापना केली आहे. ही समिती विवाहाचे किमान वय आणि आरोग्याच्या दृष्टीने मातृत्वाचा संबंध, आई आणि नवजात बालकाची सुयोग्य स्थिती, याशिवाय मूल-गर्भधारणेदरम्यानचा काळ आणि जन्मानंतरचे परीक्षण याबाबत अभ्यास करत आहे. याशिवाय बालमृत्यू दर, मातृ मृत्यू दर, एकूण प्रजनन दर, जन्म प्रमाण आणि बाललिंग प्रमाण यासारख्या मुख्य बाबींच्या अनुषंगाने अभ्यास करत ही समिती सध्याच्या महिलांच्या किमान 18 वर्षांहून 21 वर्ष करण्याबाबत शिफारशी मांडेल. समता पक्षाच्या माजी अध्यक्ष जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या या समितीत निती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या विभागाच्या सचिवांचा समावेश आहे.
 
विवाहासाठी किमान वयाची अट का?
कायद्याने बालविवाह आणि अल्पवयीन मुलांचा होणारा गैरवापर रोखण्यासाठी विवाहासाठी किमान वयाची तरतूद करण्यात आली आहे. विवाहाशी संबंधित विविध धर्मांच्या स्वतंत्र कायद्यांची विशिष्ट मानके असतात. जी बहुतेक वेळा प्रथा-परंपरा यांचे प्रतिबिंब दर्शवतात. या प्रथा-परंपरा थांबवण्यासाठी महिलांना विवाहासाठी किमान वयाची अट निर्धारित करण्यात आली आहे. याशिवाय अल्पवयीन मुलगा किंवा मुलीवर लैंगिक, शारीरिक अत्याचार होऊ नये. यासाठी तो कायद्यानुसार बलात्कार मानण्यात आला आहे.
 
असा झाला कायद्याचा विकास...
1. 1860 मध्ये भारतीय दंडसंहिता लागू करण्यात आल्यानंतर त्यात 10 वर्षे मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे हा गुन्हा ठरवण्यात आला.
2. 1880 च्या दशकात भारतात महिलांना विवाहासाठीच्या निर्धारित वयाबाबत कायदेशीर विचार सुरू झाला.
3. 1927 च्या सहमती विधेयकात तरतूद करून 12 वर्षांखालील मुलाशी विवाह करणे अवैध मानण्यात आले.
4. 1929 मध्ये बालविवाह प्रतिबंध अधिनियमाने मुली आणि मुलासाठी लग्नाचे किमान वय अनुक्रमे 16 आणि 18 वर्षे निर्धारित करण्यात आले.
5. 1955 मध्ये हिंदूंसाठी हिंदू विवाह कायद्यानुसार पुरुष व स्त्रियांसाठी विवाहाचे किमान वय अनुक्रमे 21 वर्षे आणि 18 वर्षे निर्धारित करण्यात आले.
5. 1978 मध्ये शारदा कायद्यानुसार पुरुष व स्त्रियांसाठी विवाहाचे किमान वय अनुक्रमे 21 वर्षे आणि 18 वर्षे असण्याची तरतूद करण्यात आली. (न्यायमूर्ती हरिबिलास शारदा यांच्या नावावरून हा कायदा शारदा ऍक्‍ट म्हणून प्रसिद्ध आहे.)
 
पुरुष-महिलांसाठी विवाहाचे वय भिन्न का?
पुरुष आणि स्त्रिया यांच्या विवाहासाठी वयाच्या वेगवेगळ्या कायदेशीर मानकांबद्दल कायद्यात कोणतेही तर्क मांडण्यात आलेले नाहीत. वेगवेगळ्या कायदेशीर मानकांनुसार पत्नी ही पतीपेक्षा लहान असावी; मात्र ही बाब रुढी-पंरपरांना हातभार लावण्यास मदत करते. महिला हक्क कार्यकर्त्यांनी केलेल्या युक्तिवादानुसार समान वयाच्या पुरुषांपेक्षा महिला अधिक प्रौढ असतात. म्हणून त्यांना लवकर विवाह करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. कायद्याने ही बाब कायम ठेवली आहे; तर महिलांविरुद्ध भेदभाव निर्मूलन या विषयावरील आंतरराष्ट्रीय तह समितीकडून (सीएडीएडब्ल्यू) पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये शारीरिक किंवा बौद्धिक वाढीचा वेगळा दर असल्याचे मानणारे कायदे रद्द करण्याची मागणी लावून धरली जात आहे. समितीने शिफारस केली आहे, की दोन्हीच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षे निश्‍चित केले जाणे आवश्‍यक आहे.
 
कायद्याकडे दुर्लक्ष नको?
स्त्रियांमधील गर्भधारणेचे धोके टाळण्यासाठी लिंग-तटस्थता आणण्यापासून, स्त्रियांचे विवाहाचे किमान वय वाढवण्याच्या बाजूने अनेक युक्तिवाद करण्यात येतात. कमी वयात होणारी गर्भधारणा ही वाढत्या बाल मृत्युदराशी संबंधित आहे आणि आईच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो; मात्र असे असले तरी कायदा झुगारून आजही देशातील ग्रामीण भागात बालविवाहाची अनेक प्रकरणे समोर येतात. त्यामुळे कायद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
 
बालविवाह प्रथा सुरूच...
2 जुलै रोजी युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडने (यूएनएफपीए) प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे, की बालविवाहावर सर्वत्र बंदी घातली गेली आहे; मात्र तरीही जगभरात दररोज 33 हजार बालविवाह घडतात. आतापर्यंत अंदाजित 650 दशलक्ष मुलींचा लहान वयात विवाह झाला आणि 2030 पर्यंत 18 वर्षांखालील आणखी 150 दशलक्ष मुलींचा विवाह केला जाईल. दरम्यान, युनिसेफच्या अंदाजानुसार दरवर्षी 18 वर्षांखालील किमान 1.5 दशलक्ष मुलींचे लग्न भारतात केले जाते. ज्यामुळे भारत हा जगातील सर्वाधिक बालवधू असलेला देश ठरतो. जगातील एकूण बालविवाहांपैकी एक तृतीयांश बालविवाह हे भारतात होतात. भारतात सध्या 15 ते 19 वर्षे वयातील 16 टक्के किशोरवयीन मुली विवाहित आहेत, असेही युनिसेफने म्हटले आहे.
Edited  by : Mangesh Mahale    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com