अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारला जाणार  - A statue of Ahilya Devi Holkar will be erected | Politics Marathi News - Sarkarnama

अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभारला जाणार 

संपत मोरे
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी  जाहीर केले.

पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या प्रांगणात अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी काल जाहीर केले. 'विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर अध्यासन सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. काल आमदार रोहित पवार यांनी याबाबतचे निवेदन मंत्री सामंत यांना दिले होते.

आज  उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य अश्वारूढ पुतळा आणि त्यांचे अध्यासन राज्य सरकारच्या वतीने लवकरच उभा करण्याचे जाहीर केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात लोकवर्गणी काढून पुतळा उभा करण्याबाबत कुलगुरू मृणालिनी फडणीस यांनी समिती स्थापन केली होती. मात्र, महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात महापुरुषांचे पुतळे शासकीय निधीतून झाले आहेत.  अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा शासकीय निधीतून व्हावा' अशी मागणी होत होती. 

धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी गेल्या आठवड्यात 'अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा सरकारनेच उभा करावा,' अशी मागणी करत कुलगुरूंच्या चौकशीची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे निवेदन देऊन, 'राज्य सरकारने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभा करावा,' अशी मागणी केली होती. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनीही 'अहिल्यादेवींचा पुतळा सरकारने उभा करावा,' अशी मागणी केली होती.

याबाबत आमदार रोहित पवार यांनी शिक्षणमंत्री उदय सामंत यांना भेटून 'राजमाता अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा शासकीय खर्चाने उभा करावा.' अशी मागणी काल केली होती. आज उदय सामंत यांनी याबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कुलगुरू मृणालिनी फडणीस, आमदार रोहित पवार, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख, उपाध्यक्ष सूरज चव्हाण यांची बैठक घेतली. 

बैठकीत मंत्री सामंत यांनी, 'अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्य सरकारकडून त्यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करण्यात येईल,' असे जाहीर केले. विद्यापीठात अहिल्यादेवी होळकर अध्यासनाचे काम लवकरच मार्गी लागेल, असे सामंत म्हणाले. या बैठकीनंतर बोलताना रोहित पवार म्हणाले, "राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पुतळा त्यांच्याच नावाने असलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या प्रांगणात उभा राहतोय ही समाधान वाटणारी गोष्ट आहे. अहिल्यादेवी यांचा पुतळा सर्वांनाच प्रेरणा देईल. त्यांनी जो समाजाला विचार दिला आहे, त्याचे आपल्याला सतत स्मरण होईल. विद्यापीठात शिकणाऱ्या भावी पिढीला आपल्या ध्येय आणि सामाजिक बांधिलकीची आठवण होईल."
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख