राज ठाकरेंचा सरकारला सवाल..मॉल उघडले, मंदिरं का नाहीत? - Raj Thackeray will talk to the government about opening religious places | Politics Marathi News - Sarkarnama

राज ठाकरेंचा सरकारला सवाल..मॉल उघडले, मंदिरं का नाहीत?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? " असे राज ठाकरे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

मुंबई : राज्यातील धार्मिळ स्थळं उघडण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्य सरकारशी बोलणार आहेत. लॅाकडाउनपासून राज्यातील धार्मिळ स्थळं बंद आहेत. ते उघडावे, यासाठी धार्मिळ स्थळांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेतली. याबाबत राज ठाकरे यांच्याशी या प्रतिनिधींनी चर्चा केली. याबाबतची माहिती मनसेच्या टि्वटवरून ही माहिती दिली आहे. 

"धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत? " असे राज ठाकरे यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. याबाबतचा व्हिडिओ मनसेने टि्वटरवरून शेअर केला आहे.  

देशभरात कोरोनाच्या साथीमुळे लावाव्या लागलेल्या लाॅकडाऊनमुळे १८ मार्चपासून धार्मिक स्थळे बंद आहेत. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराबाबत एका कार्यकर्त्याने ट्विटरवरुन केलेल्या विनंतीला आमदार रोहित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मंदिरे सुरु करण्याबाबत आपण पाठपुरावा करुन असे उत्तर रोहित पवार यांनी या कार्यकर्त्याला दिले आहे. 

'मंदिर चालू करा दादा , तुळजाभवानी मंदिर ५ महीने झाले बंद आहे. इथल्या व्यापाऱ्यांना खूप त्रास होत आहे, बैंक ईएमआय वाढत चाललेत,' असे ट्विट एका कार्यकर्त्याने रोहित पवार यांना टॅग करत केले. त्यावर 'मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील,' असे उत्तर रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे दिले. 

दरम्यान, देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जम्मू-काश्‍मिरातील वैष्णोदेवी मंदिर  भाविकांसाठी खुले होत आहे. कोरोना संकटामुळे पाच महिन्यांपासून बंद असलेले मंदिर खुले होत असून दररोज दोन हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  १८ मार्च रोजी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. आता देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्याने मंदिरही सुरू होत आहे. त्याचाच भाग म्हणून पहिल्या आठवड्यात दररोज दोन हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतरही परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे श्री वैष्णोदेवी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कुमार यांनी सांगितले.

संबंधित लेख