राहुल गांधी म्हणाले,  "सरकारने, विद्यार्थ्यांची 'मन की बात' ऐकावी.."  - Rahul Gandhi worries about JEE exams | Politics Marathi News - Sarkarnama

राहुल गांधी म्हणाले,  "सरकारने, विद्यार्थ्यांची 'मन की बात' ऐकावी.." 

वृत्तसंस्था
रविवार, 23 ऑगस्ट 2020

राहुल गांधी यांनी आज नीट आणि जेईई परीक्षांबाबत चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचा विचार करून या परीक्षांबाबत योग्य तो समाधानकारक पर्याय सरकारने काढावा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज नीट आणि जेईई परीक्षांबाबत चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचा विचार करून या परीक्षांबाबत योग्य तो समाधानकारक पर्याय सरकारने काढावा, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. याबाबत राहुल गांधी यांनी टि्वट केलं आहे. आपल्या टि्वटमध्ये राहुल गांधी म्हणतात, "केंद्र सरकारने नीट आणि जेईई परीक्षांबाबत विद्यार्थ्यांची 'मन की बात' (#StudentsKeMannKiBaat) ऐकली पाहिजे. याबाबत समाधानकारक निर्णय घेतला पाहिजे." 

आयआयटी प्रवेशासाठीची सामायिक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नीट) ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तत्पूर्वी कोरोनाच्या संकटामुळे ही परीक्षा रद्द केली जावी अशी मागणी करणारी विद्यार्थी संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती, त्या पार्श्वभूमीवर नुकतेच केंद्र सरकारने या दोन्ही परीक्षा ठरल्याप्रमाणे घेण्याचे निश्‍चित केले आहे.

जेईई (मेन) परीक्षा एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या दरम्यान होण्याची शक्यता आहे. जेईई (एडवांस्ड) ता.27 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर नीट  ता. 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई आणि नीट परीक्षा ठरलेल्या वेळेतच होईल, असे शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या परीक्षा रद्द कराव्या, असे टि्वट प्रियंका गांधी यांनी नुकतेच केले होते.   

राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) जेईई मेनसाठीचे प्रवेशपत्र जारी केले असून तब्बल ६.५ लाख विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केले आहे. या परीक्षेसाठी ८.६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. जेईई मेनची परीक्षा १ ते ६ सप्टेंबरदरम्यान तर नीटची परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे नियोजन आहे. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यानंतर केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्याचे नियोजन आखण्यात आले असून विद्यार्थ्यांना नवे फेस मास्क आणि हातमोजे देखील देण्यात येतील. 

जेईईसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ १२० जणांनीच शहरे तसेच परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्याची विनंती केली आहे अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा संस्थने विद्यार्थ्यांना पाच वेळा परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली होती, यापैकी ९९.०७ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेले केंद्र हे योग्यच असल्याचे म्हटले आहे.
Edited  by : Mangesh Mahale   
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख