उपचारासाठी डॉक्टर मिळावेत यासाठी नीट-पीजी प्रवेश परीक्षा ढकलली पुढे; मोदी सरकारचा निर्णय - central government postponed neet pg entrance exam due to covid crisis | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

उपचारासाठी डॉक्टर मिळावेत यासाठी नीट-पीजी प्रवेश परीक्षा ढकलली पुढे; मोदी सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था
सोमवार, 3 मे 2021

देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. यामुळे रुग्णालये अपुरी पडण्यासोबत आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. 

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ सुरूच आहे. यामुळे रुग्णालये अपुरी पडण्यासोबत आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मोदी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी डॉक्टर मिळावेत, यासाठी नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी केंद्र सरकारकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. यामुळे सरकारने नीट-पीजी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 31 ऑगस्टआधी घेतली जाणार नाही आणि परीक्षा घेण्याआधी एक महिना तारीख जाहीर करण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने सरकारला पात्र डॉक्टर आणि वैद्यकीयचे विद्यार्थी कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी उपलब्ध होतील, असे सरकारने म्हटले आहे. 

हेही वाचा : कोरोना विरोधातील लढ्यात मोदी सरकार उतरवणार एमबीबीएसचे विद्यार्थी 

कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी 100 दिवस देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सरकार  विशेष सन्मान करणार आहे. कोरोना ड्युटी 100 दिवस पूर्ण करणाऱ्यांना आता पंतप्रधान कोविड राष्ट्रीय सेवा सम्मान मिळेल. हा सन्मान मिळालेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात सरकारी नोकरीसाठी अर्ज करताना याचा फायदा होईल. 

देशात 24 तासांत 3 हजार 417 मृत्यू 
देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. देशात आज सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 3 लाख 68 हजार नवीन रुग्ण सापडले असून, 3 हजार 417 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आता दरतासाला सुमारे 142 जणांचा कोरोनामुळे बळी जात आहे. देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 झाली असून, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 2 लाख 18 हजार 959 झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 

सक्रिय रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक 
देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाखांवर गेली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला आहे. यामुळे रुग्णांसाठी रुग्णालये अपुरी पडू लागल्याचे चित्र आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या दररोज वेगाने वाढत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 34 लाख 13 हजार 642 असून, एकूण बाधितांमध्ये याचे प्रमाण 17.13 टक्के आहे. देशात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन ते 81.77 टक्क्यांवर आले आहे. देशात बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 62 लाख 93 हजार 3 आहे. याचवेळी मृत्यूदर 1.10 टक्के आहे. 

देशातील कोरोना रुग्णसंख्या वाढीचे टप्पे 
20 लाख : 7 ऑगस्ट  (2020) 
30 लाख : 23 ऑगस्ट  
40 लाख : 5 सप्टेंबर  
50 लाख : 16 सप्टेंबर 
60 लाख : 28 सप्टेंबर 
70 लाख : 11 ऑक्टोबर  
80 लाख : 29 ऑक्टोबर  
90 लाख : 20 नोव्हेंबर 
1 कोटी : 19 डिसेंबर 
1.5 कोटी : 19 एप्रिल (2021)  

Edited by Sanjay Jadhav

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख