संधी करिअरच्या : इंजिनिअरिंग डिप्लोमा फायदे आणि तोटे - Advantages and Disadvantages of Engineering Diploma Course-rm82 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

संधी करिअरच्या : इंजिनिअरिंग डिप्लोमा फायदे आणि तोटे

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 21 जुलै 2021

दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी ‘सीईटी’ची परीक्षा देण्याची गरज नाही.

दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. अकरावी प्रवेशासाठी ‘सीईटी’ घेण्यात येणार असली, तरी दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे आणि त्यासाठी ‘सीईटी’ची परीक्षा देण्याची गरज नाही. ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचे आहे, त्यांना दहावीनंतर अकरावी, बारावी सायन्स किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा हे दोन पर्याय असतात आणि दोन्ही मार्गांनी दहावीनंतर सहा वर्षांत इंजिनिअरिंग पदवी शिक्षण पूर्ण करता येते. म्हणूनच यातील कोणता पर्याय निवडावा याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम आहे. मी इथे दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमाला जाण्याचे फायदे व तोटे नमूद करणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना निर्णय घेणे सोपे जाईल. (Advantages and Disadvantages of Engineering Diploma Course)

डिप्लोमाचे फायदे

1 ) अकरावी बारावीचा सायन्सचा अभ्यास, सीईटी/जेईई, त्याचे क्लासेस, भरमसाठ फी, अभियांत्रिकी पदवीच्या पहिल्या वर्षात नापास होण्याचे/विषय राहण्याचे मोठे प्रमाण या सगळ्यातून सुटका होऊन डिप्लोमानंतर थेट डिग्रीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो.

2) दहावीपर्यंत संपूर्ण मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांना इंग्रजी माध्यमाचा सराव होऊन चांगले मार्क मिळवण्यासाठी डिप्लोमामध्ये तीन वर्षांचा अवधी मिळतो, जो अकरावी बारावीमध्ये दोनच वर्षांचा असतो.

3) डिप्लोमा हे व्यावसायिक क्वालिफिकेशन असल्याने डिप्लोमानंतरही नोकरी/व्यवसाय सुरू करता येतो. रेल्वे, संरक्षण दले, आरटीओ, भेल, महावितरण अशा विविध सरकारी, निमसरकारी उद्योगांबरोबरच खासगी क्षेत्रातही नोकरीच्या संधी डिप्लोमानंतर मिळतात.

4) डिप्लोमानंतर जसा इंजिनिअरिंग डिग्रीला प्रवेश मिळू शकतो, तसाच तो बीबीए, आर्किटेक्चर, बीएससी व्होकेशनल अशा अभ्यासक्रमांनाही मिळू शकतो.

हेही वाचा : बारावीनंतर काय? मेडिकल, इंजिनिअरिंगसह करिअरसाठी अनेक मार्ग

डिप्लोमाचे तोटे

1) बारावीनंतरही विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगची कोणती शाखा निवडावी याबद्दल संभ्रम असतो, येथे तर दहावीनंतरच डिप्लोमाला प्रवेश घेताना शाखा निवडावी लागते, त्यामुळे ती ऐकीव माहितीवर निवडली जाते.

2) बारावीनंतर इंजिनिअरिंग पदवीसाठी उपलब्ध होणाऱ्या जागांपेक्षा डिप्लोमानंतर इंजिनिअरिंग पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागा फारच कमी, म्हणजे 10% असतात.

3) बारावीनंतर राज्यस्तरीय स्पर्धा व किचकट प्रवेश प्रक्रिया टाळण्यासाठी डिप्लोमाला जाण्याचा मार्ग निवडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की ही राज्यस्तरीय स्पर्धा व किचकट प्रवेश प्रक्रिया यांना डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षांनंतर इंजिनिअरिंग पदवी प्रवेशावेळी तोंड द्यावेच लागते.

दहावीनंतर इंजिनिअरिंग डिप्लोमा प्रवेशासाठी राज्यस्तरीय केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे, त्याविषयी सविस्तर माहिती www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर मिळेल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा मुख्य फायदा म्हणजे, विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसते. डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या अनेक शाखा आहेत, त्यापैकी काही एकेका महाविद्यालयातच आहेत, काही शाखांमध्ये कोर्स पूर्ण केल्यानंतर 100% रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, शासकीय तंत्रनिकेतन मुंबई येथे रबर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे, जो ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशन यांच्या सहकार्याने चालवला जातो. विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण केल्यानंतर 100%नोकरी मिळतेच, शिवाय त्यांना इंजिनिअरिंग पदवीचा पर्यायही उपलब्ध असतो.

मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या उपक्रमांतर्गत तंत्रकौशल्ये आत्मसात केलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी या पर्यायाकडे पाहावे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख