'अभाविप' ने जाळला अब्दुल सत्तारांचा पुतळा - ABVP Activists Burnt Effigy of Abdul Sattar at Dhule | Politics Marathi News - Sarkarnama

'अभाविप' ने जाळला अब्दुल सत्तारांचा पुतळा

लक्ष्मण सोळुंके
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल रास्ता रोको आंदोलन केले. अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर हा प्रकार झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. अभाविपने त्याचा निषेध केला आहे

जालना : धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत .या मारहाणीचा निषेध करण्यासाठी आज जालन्यातील गांधीचमन चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांचा पुतळा जाळला. आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काल रास्ता रोको आंदोलन केले. अब्दुल सत्तार यांच्या वाहनासमोर हा प्रकार झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला. विविध मागण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घ्यायची होती, पण त्यांची भेट घेऊ दिली जात नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी थेट अब्दुल सत्तार यांची गाडी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच रास्ता रोको केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध अभाविपने केला आहे. 

विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी काल केला होता. शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क तीस टक्के माफ करावे, अशी मागणी यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केली होती. 

शैक्षणिक परिक्षा घेण्यात येत नसतील तर परिक्षा शुल्क माफ करा या मागणीचे निवेदन देण्यात गेलेल्या अभाविपच्या विद्यार्थ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संमतीनेच पोलीसांनी मारहाण केली, असा आरोप राज्याचे माजी मंत्री व भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केला आहे.

धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे काल धुळे दौऱ्यावर होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यानी शैक्षणिक परिक्षा शुल्क माफ करावे, या मागणीसाठी आंदोलन केले, त्यांचे वाहन रोखले त्यावेळी पोलीसांनी या विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेचा भाजपा नेते गिरीश महाजन यांनी निषेध केला आहे. याबाबत आपल्या फेसबुक वॉलवर आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पोलीस मारहाण करीत असलेला व्हिडीओ शेअर केला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख