रणजितसिंह मोहिते पाटलांना जोरदार टक्कर दिली... पण राष्ट्रवादीने धवलसिंहांची दखल नाही घेतली!

राष्ट्रवादीतून पहिल्यांदाच काॅंग्रेसमध्ये प्रवेश
Dhawalsinh and Ranjitsinh mohite patil
Dhawalsinh and Ranjitsinh mohite patil

पंढरपूर : धवलसिंह मोहिते पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी काॅंग्रेस असा राजकीय प्रवास केल्यानंतर आता काॅग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्यातील काॅग्रेसला बळकटी मिळणार आहे. पण त्यांनी राष्ट्रवादी सोडून काॅंग्रेसचा पर्याय का स्वीकारला, या प्रश्नाचे उत्तर शोधले जात आहे. कार्यकर्त्यांमधील चर्चेनुसार राष्ट्रवादीत त्यांची दखल घेतली नसल्यानेच त्यांनी काॅंग्रेसचा हात धरल्याची  चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यांच्या काॅंग्रेसमधील प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात घडामोडी सुरू झाल्या आहेत. चार वर्षांतच त्यांनी दोन पक्ष बदलत आता तिसऱ्या पक्षात बस्तान बांधण्याचे ठरविलेले आहे. 

मोहिते पाटील हे २८ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता टिळक भवन दादर, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या धवलसिंह मोहिते पाटील यांनी अलीकडेच विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या या मागणीकडे पक्ष नेतृत्वाने दुर्लक्ष तर केलेच शिवाय त्यांना पक्ष संघटनेत देखील कुठेच संधी दिली गेली नाही. विधानसभा निवडणुकीत डाॅ. धवलसिंह यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्यासाठी माळशिरस विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रयत्न केले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. अशा वेळी धवलसिंह यांनी राष्ट्रवादीला साथ दिली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे जानकर हे जोरदार टक्कर दिली होती. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्ह्यातील एका समर्थक आमदार गटानेच धवलसिंह मोहिते पाटील यांना  पक्षात स्थान मिळू दिले नसल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. त्यानंतरही धवलसिंह यांनी ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप नेते आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात अकलूजसह माळशिरस तालुक्यातील 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरसीने लढवल्या होत्या. या निवडणुकीत भाजप  विरूद्ध राष्ट्रवादी अशीच लढत झाली. अकलजूमध्ये माजी  उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे संग्रामसिंह मोहिते पाटील यांचा धक्कादायक पराभव करत तीन जागा मिळवल्या. मागील काही दिवसांपासून धवलसिंह राष्ट्रवादीची ताकद वाढवत असतानाच अचानक त्यांनी काॅग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी जवळीक असतानाही त्यांनी घेतलेला हा निर्णय राजकीय निरीक्षकांच्या भुवया  उंचावयाला लावणारा आहे.

याबाबत राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष बळीरामकाका साठे यांना विचारले असता, ते म्हणाले धवलसिंह यांनी राष्ट्रवादीत काम करावे अशी माझी सुरवाती पासून खूप इच्छा होती. त्यांच्यात काम करण्याची धमक आहे. पक्षाने देखील त्यांना काम करण्याची संधी दिली असती तर त्यांनी नक्कीच ती जबाबदारी स्वीकारली असती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार संजयमामा शिंदे यांनी मात्र धवलसिंह यांच्या काॅग्रेस पक्ष प्रवेशा बद्दल सावध प्रतिक्रिया दिली आहे. कोणी कोणत्या पक्षात जावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. राष्ट्रवादी ऐवजी काॅग्रेसमध्ये का प्रवेश केला हे त्यांनाच विचारलं तर  बरं होईल असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com